दौंड : महान्यूज लाईव्ह
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कासुर्डी टोलनाका येथे वाहतुक सुरक्षतेचे कामकाज करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर दादागिरी करत मारहाण केल्याप्रकरणी दौंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या डॉ. वंदना मोहिते यांना दौंड न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी ( दि १५) पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कासुर्डी टोल नाका येथे महामार्गावरील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक नितीन भानुदास कोहक तसेच उपनिरीक्षक रोकडे व इतर पोलीस कर्मचारी काम करीत होते.
हे सर्वजण शासकीय गणवेशामध्ये पुण्याकडे जाणारी वाहतुक बंद करून पालखी महामार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही त्या दृष्टिकोनातून सुरक्षितेचे कामकाज करीत असताना व शासनाने नेमणूक केलेल्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या डॉक्टर वंदना मोहिते या ग्रे रंगाची मारुती कार (सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार नं एच ४२ ए.एक्स ९३२९ ) मधून प्रवास करीत होत्या.
त्यांनी वाहतूक पोलीस कर्मचारी नितीन कोहक यांच्यासोबत अरेरावी करत गालावर चापट मारली आणि जबरदस्तीने बॅरीकेटींग काढून तेथुन पुणे बाजुकडे निघुन गेल्या. या प्रकरणी वंदना मोहिते यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा करणे, पोलीस कर्मचारी यांना मारहाण केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी मोहीतेंना अटक करुन शुक्रवारी (दि.१६) दौंड न्यायालयात हजर केले असता दौंड न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा अधिक तपास यवत पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक माधुरी तावरे या करीत आहेत.