वैष्णवांचा मेळा यवत मुक्कामी विसावला!
राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
दौंड : हातात भगवे ध्वज, टाळांचा गजर, मुखी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करीत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यात पोहचताच पुष्पवृष्टी करत व वारकरी भाविकांना गुलाब पुष्प देऊन या भव्य दिव्य सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले.
दरम्यान , दौंड तालुक्याच्या हद्दीत पालखी पोहचताच पालखीच्या दर्शनांसाठी महिला, लहान मुले , ज्येष्ठ नागरिक यांची झुंबड उडाली. जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लोणी काळभोर चा मुक्काम आटोपून गुरुवारी ( दि.१५) सकाळी ७ वाजता पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. लाखो वैष्णवांचा हा मेळावा पुणे – सोलापूर राष्ट्रीय मार्गावरून टाळ मृदूंगाच्या गजरात दौंड तालुक्याच्या हद्दीत सायंकाळी साडेचार वाजण्यास सुमारास दौंड तालुक्यातील बोरीभडक हद्दीत पोहचला.
यावेळी या पालखी सोहळ्यावर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत केले, तसेच वारकरी भाविकांना गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन स्वागत केले. याप्रसंगी बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे, दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात,दौंड – पुरंदर चे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजिंक्य येळे, दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आदी यावेळी उपस्थित होते.
हा वैष्णवांचा सोहळा संध्याकाळी यवत चे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये मुक्कामी पोहचला. दरवर्षीप्रमाणे यंदाही यवत ग्रामस्थांच्या वतीने भोजन व्यवस्था म्हणून पिठलं भाकरीची संध्याकाळची न्याहारीची व्यवस्था केली होती.