किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती गाव नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या आदर्श उपक्रमांचा आढावा घेते. आता देखील जाचकवस्तीने असा एक पायंडा पाडला आहे की, ज्यातून एखाद्या कुटुंबातील व्यक्ती देवाघरी गेली, तरी त्यांच्या स्मृती मात्र त्यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनाही चिरंतन स्मरणात राहाव्यात.
जाचकवस्ती गावातील रत्नप्रभा माणिकराव निंबाळकर (धनी) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले त्यांच्या स्मृती चिरंतन राहत म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांना एक रोप भेट देण्यात आले आणि त्यांच्या नावाने हे रोप लावण्यात आले. तसेच ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी निंबाळकर यांच्या घरी जाऊन त्यांना मृत्यूचा दाखला देखील सुपूर्त केला.
यापुढील काळात जाचकवस्ती गावात निधन झालेल्या व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करायचे आणि त्यांचा मृत्यूचा दाखला तिथे त्यांच्या घरी नेऊन द्यायचा, त्याचा संकल्प केला असून त्याची सुरुवात रत्नप्रभा निंबाळकर यांच्या माध्यमातून करण्यात आली.
असा उपक्रम इंदापूर तालुक्यात राबविणारी जाचकवस्ती ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. ही योजना राबविण्याची संकल्पना ही जाचकवस्ती गावच्या विद्यमान सरपंच सोनाली महेश निंबाळकर व सर्व सदस्य यांची होती. यावेळी राष्ट्रवादीचे नेते विक्रमसिंह निंबाळकर यांच्यासह गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.