राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस येथील भागवतवाडी जवळ मालवाहतूक करणारा ट्रक आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात चुलता पुतण्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
वैभव सुधाकर हाके (वय १८), बिभीषण बालाजी हाके ( वय ३२, दोघेही रा. बंडगरवाडी ता बसवकल्याण, कर्नाटक ) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या चुलता पुतण्याची नावे आहेत. आज गुरुवारी (दिनांक १५) पहाटे दोन वाजण्याच्या आसपास पाटस जवळील भागवतवाडी येथे हा अपघात झाला.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, लोखंडी अँगलची वाहतूक करणारा मालवाहतूक ट्रक सोलापूर बाजूकडून पुणे दिशेला भरधाव वेगाने जात असताना भागवतवाडी जवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर हा रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला.
या अपघातात ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाला, पण ट्रकमधील चालक बिभीषण हाके व त्याचा पुतण्या वैभव हाके हे या अपघातात जागीच मरण पावले. हा अपघात एवढा भीषण होता की, लोखंडी अँगल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चेंदामेंदा झाला. ट्रकचे तुकडे रस्त्यावर विचित्र अवस्थेत पडले. लोखंडी अँगल हे पुढच्या वाहन चालकाच्या केबिनमध्ये घुसल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान वैभव याने यंदा इयत्ता बारावीचे परीक्षा दिल्याने नुकताच जाहीर झालेल्या निकालात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. या दोघांच्या मृत्यूने कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बंडगरवाडीत शोककळा पसरली. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस शिपाई समीर भालेराव, हनुमंत भगत, संदीप कदम आदींनी घटनास्थळी धाव घेत ट्रकमधील मृतदेह बाहेर काढले.