राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यात विजेचा खोळंबा झाला आहे, रस्ते खड्डेमय झाले आहेत, तालुक्याला तहसीलदार मिळेना, या सर्व प्रकाराकडे राज्य सरकार आणि स्थानिक आमदाराचे दुर्लक्ष होत आहे. जनतेचे प्रश्न सोडवा, अन्यथा जनता रस्त्यावर उतरून उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश थोरात यांनी राज्य सरकारला दिला आहे.
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा सातत्याने खंडित केला जात आहे, याच्या निषेधार्थ दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि १३) केडगाव – दापोडी येथील महावितरण वीज कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
यावेळी बोलताना रमेश थोरात म्हणाले की, तालुक्यात विजेचा खेळ खंडोबा झाला आहे वीज बिले भरूनही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सातत्याने खंडित केला जात आहे. विज कार्यालयात अधिकारी उपस्थित नसतात अनेक ठिकाणी रोहीत्रांची दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. या प्रकारामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. तसेच शिरूर – चौफुला रस्त्यावर खड्डे पडल्याने अतिशय दयनीय दुरवस्था झाली आहे.
अनेक अपघात या रस्त्यावर होत आहेत. या सर्व प्रकाराकडे राज्य सरकार व स्थानिक आमदारांचा दुर्लक्ष आहे, जनतेने तुम्हाला कामे करण्यासाठी पदावर बसवले आहे. ते कामे करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मी आमदार असताना तालुक्यात चार ठिकाणी वीज उपकेंद्रे उभारली. २७०० रोहित्रे ठीक ठिकाणी बसवली. विजेच्या समस्या तात्काळ सोडवल्या. मात्र हे सरकारचे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे,असा आरोप थोरात यांनी यावेळी बोलताना केला.
तसेच आळंदीत वारकरी संप्रदायावर झालेला लाठी हल्ल्याचा ही निषेध करीत इतिहासात पहिल्यांदाच आषाढी एकादशी निमित्त चाललेल्या वारकरी संप्रदायावर शिंदे फडणवीस सरकारने लाठी हल्ला करूनही बेजबाबदार देवेंद्र फडणवीस म्हणतात असं काय प्रकार झालाच नाही. लाठी हल्ला झाल्याचा प्रकार महाराष्ट्राने पाहिला आहे. हे सरकार केवळ लोकांची दिशाभूल करत आहे. असा हल्लाबोल रमेश थोरात यांनी या मोर्चात बोलताना केला.
यावेळी सखाराम शिंदे, पोपटराव ताकवणे, विकास खळदकर, संभाजी ताकवणे, पुरुषोत्तम हंबीर , अप्पासाहेब पवार, चैतन्य पाटोळे आदींची भाषणे झाली. याप्रसंगी गणेश थोरात, वंदना मोहिते, सागर फडके, बाळासाहेब निवगुंणे, रामभाऊ टुले, शिवाजी ढमाले, हेमलता फडके, मिना धायगुडे,उमेश म्हेत्रे, दिलीप हंडाळ, वीरधवल जगदाळे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चा सहभागी झाले होते.