दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सोसायटी गटाच्या उमेदवारांची पुन्हा फेरमतमोजणी करण्याचे आदेश नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने दौंड सहकार सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहेत. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सोसायटी
गटातून पराभूत झालेले माजी आमदार रमेश थोरात गटाचे ऊमेदवार कल्याण पवार, संतोष वरघडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने वरील आदेशाच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
विविध कार्यकारी सोसायटी या सर्वसाधारण मतदारसंघासाठी २७ जून २०२३ च्या आत फेर मतमोजणी करण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे.
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीत आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात गटाच्या उमेदवारात काट्याची लढाई झाली होती. या निवडणुकीत दोन्ही गटाचे नऊ- नऊ समान उमेदवार विजयी झाले होते. दरम्यान, माजी आमदार रमेश थोरात गटाच्या एका विजयी उमेदवारांचे निधन झाले.
साहजिकच आमदार कूल गटाकडे नऊ तर माजी आमदार गटाकडे आठ सदस्य संख्या होती. त्यामुळे आमदार राहुल कुल गटाकडे दौंड बाजार समितीची सत्ता आली. एकंदरीतच सहकारी सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघातील अकरा जागा पैकी सात जागा थोरात गटाला तर चार जागा कुल गटाला मिळाल्या होत्या.
दरम्यान, थोरात गटातील संतोष वरघडे हे एक मतांनी तर कल्याणराव पवार हे तीन मतांनी पराभूत झाले होते. परिणामी संतोष वरघडे आणि कल्याण पवार यांनी मुंबई उच्च न्यायालय फेर मतमोजणीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊन संबंधित निर्णय देण्यात आला आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित तावरे म्हणाले की कायद्याच्या बाबी तपासून योग्य ते कामकाज केले जाईल. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मतमोजणीचे आदेश दिल्याने आमदार कुल गट आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.