राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या चार ते पाच दुकानांचे पत्रे कापून दुकानांचे साहित्य जाळून दुकानातील साहित्यांची चोरी करून फरार झालेल्या संशयित आरोपी पैकी दोन आरोपींना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
चीच्या उर्फ नसरीन हीरामण भोसले (वय २२, रा. कोऱ्हाळे, ता. बारामती), कुलमुख उर्फ कामदेव शिवाजी काळे(वय २०, रा चितेगांव पठाणखेडा, जि. औरंगाबाद मुळ रा. वायरलेसफाटा गिरीम, ता. दौड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
काही दिवसांपूर्वी पाटस येथील फर्निचर या दुकानाचा पत्रा कापून दुकानात प्रवेश करून सलग चार ते पाच दुकानातील तांब्याच्या तारांची चोरी केली व ४५ लाख रुपयांच्या फर्निचरच्या दुकानाला आग लावून नुकसान केले होते. या पुण्यातील दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
त्यांनी दौंड, यवत, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीसह नगर जिल्ह्यात चोरी केल्याची कबुली दिली आहे. अशी माहिती शिळीमकर यांनी दिली. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला गुन्हा गंभीर असल्याने सदर घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस तपास करित असताना संशयित आरोपी नसरूद्दीन भोसले हा केडगाव चौफुला येथील पुलाखाली थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी तत्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, पुलाखाली दोघेजण उभे असलेले दिसून आले. त्यांच्याकडे नाव व पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव वरीलप्रमाणे सांगितले. तसेच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दौंड, यवत, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, तसेच नगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर चोरीचा माल हा औरंगाबाद व दौंड येथे भंगारात विक्री केल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी यवत पोलिसांकडे अधिक तपासासाठी दिले आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजय घुले, असिफ शेख, स्वप्निल अहीवळे, अभिजीत एकशिंगे, मुकुंद कदम यांच्या पथकाने केली.