दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : काय एकेक गमतीशीर गोष्टी घडतात पहा.. वाई तालुक्यातील चिखली गावात चोरट्याने घरात प्रवेश करून मोबाईल आणि रोख रक्कम पळवली. पण चोरटा जवळचाच निघाला. आपला मोबाईल हरवला अशा समजुतीत मालकाने मोबाईलला रिंग द्यायचा प्रयत्न केला आणि शेजारच्या खोलीत रिंग वाजली.. चोरटा काय समजायचे ते समजला.. मालक पोलीस ठाण्यात गेला तेवढ्यात चोरट्याने थायमेट खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
वाईच्या पश्चिम भागातील चिखली या गावातील आंबेडकर नगर मधील ही घटना. येथील रहिवासी स्वप्नील गुलाब सोनावले हे रात्री अकरानंतर घरात झोपी गेले. झोपण्यापूर्वी त्यांनी आपला मोबाईल खाटेवर ठेवला होता व देव्हाऱ्यात पाच हजार रुपये रोख ठेवले होते. पहाटे उठल्यानंतर कॉटवर ठेवलेला मोबाईल दिसला नाही म्हणून घरात शोधाशोध केली.
देव्हाऱ्याजवळ पोहचले तर त्याही ठिकाणी सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या. त्यामुळे ते पाठीमागच्या दाराकडे गेले. तेव्हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंतच्या काळात दाराची आतील बाजुची कडी काढून घरात प्रवेश केला आणि मोबाईल व पाच हजार रुपये रोख असे त्या चोरट्याने लंपास केल्याचे दिसून आले.
स्वप्नील सोनावले यांनी रहात्या घराच्या भोवती फिरुन चोरीस गेलेल्या मोबाईलला रिंग देण्यास सुरुवात केली. त्यावेळी शेजारच्या घरात चोरीस गेलेल्या मोबाईलची रिंग वाजताना ऐकू आली. मग सोनवले हे त्या घरात जाऊन हा मोबाईल माझा आहे असे सांगू लागले मात्र चोरट्याने तो मोबाईल चोरलेलाच नाही असा कांगावा केला आणि तो मोबाईल दिला नाही.
सोनावले यांनी वाई पोलीस ठाण्यात जाऊन चोरीची तक्रार दाखल केली चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल होतात तिकडे चोरट्याने थायमेट विषारी औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र त्याच्या कुटुंबियांनी त्यास उपचारासाठी तातडीने सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती वाई पोलिसांनी दिली आहे.