पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी येथे एस टी बस जळून खाक.
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
आज पुणे सातारा महामार्गावर आनेवाडी नजिक अचानक बसने पेट घेतला आणि अवघ्या काही मिनिटांत ही बस जळून खाक झाली. सुदैवाने बसचालकाच्या प्रसंगावधानाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
या बाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहीती आशी की, राधानगरी- पुणे विठाई बस (क्रमांक MH-13- CU-8413) ही पुणे सातारा महामार्गावरून प्रवास करत होती. चालक सागर चौगुले व वाहक सोनाली चौगले हे या बसमध्ये होते.
ही बस पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी पुलावर आले असता चालक सागर चौगले यांना इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात आले त्यांनी तात्काळ गाडी पुलावर उभी केली. सर्व प्रवाशांना खाली उतरवले, तोपर्यंत बसने पूर्ण पेट घेतला. फक्त २० मिनिटांत संपूर्ण बस जळून खाक झाली व बसचा केवळ सांगाडाच शिल्लक राहीला.
या घटनने माहीती मिळताच भुईंज पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांचे सहकारी वैभव टकले, मंदार शिंदे, किरण निंबाळकर, चंद्रकांत भोसले, रवीराज वर्णेकर व जोशीविहीर महामार्ग पोलिस हे घटना स्थळी दाखल झाले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.