पुणे : महान्यूज लाईव्ह
तीनशे वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या पंढरीच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच व्यवस्थापनातील गलथानपणामुळे वारकऱ्यांना लाठीमाराला सामोरे जावे लागले. आळंदीतील वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची समाजातून व सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. सामान्य नागरिकांनी देखील याचा निषेध करत आता तुषार भोसले यांच्यासह कथित वारकरी नेते कुठे गेले आहेत? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मात्र लाठीमार झाला नसल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या काळात वारकरी महिला जखमी झाल्या होत्या असे स्पष्टीकरण दिले आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर टीका केली असून आमदार रोहित पवार यांनी देखील यावर टीका केली आहे. मंदिर व्यवस्थापनाने यावर्षी केवळ ४७ दिंड्यांना व दिंड्या मधील प्रत्येकी ७५ वारकऱ्यांना मंदिरामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वादाचा प्रसंग निर्माण झाला. टाळ भिरकावत वारकऱ्याने पोलिसांना प्रतिकार केल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराबाहेर ही घटना घडली. यानंतर काही काळ पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे संतप्त पडसाद उमटले. मात्र सध्या विरोधक कमजोर आहेत आणि सत्ताधारीच विरोधकांची ही भूमिका सोयीनुसार बजावतात, त्यामुळे या अत्यंत निषेधार्ह घटनेच्या वेळी देखील शांतता होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचे प्रथम प्राध्यान्य होते, असे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार असं म्हणाले, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढी वारीची गौरवशाली परंपरा आहे. आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म, भक्ती परंपरेचं वैभव आहे. दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजनही केलं जातं. वारकरीही या नियोजनाला सहकार्य करत असतात. परंतु यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचं दिसत आहे.
ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी. कुठल्याही आध्यात्मिक कार्यात आणि पंढरपूर वारीसारख्या सोहळ्यात सहभागी होताना, सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावा. ईश्वरभक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेवून वारीत सहभागी व्हावं, असं आवाहन आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्यावेळी वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध! वारीच्या परंपरेत पहिल्यांदाच अशी दुर्दैवी घटना घडली. राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात येणारे काही बोगस वारकरी या सोहळ्यात घुसल्याने खऱ्या वारकऱ्यांवर अन्याय झाला आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या वारकऱ्यांवर लाठीहल्ला करण्याचं पाप या सरकारने केलं.
भक्तपरंपरेचा हा सोहळा राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी सरकारने बोगस वारकऱ्यांना आधी दूर ठेवण्याची गरज आहे. नियोजनाच्या नावाखाली मंदिरामध्ये सामान्य वारकऱ्यांना येऊ दिल जात नसल्याचं आज मीही पाहिलं, त्याचं राजकारण करायचं नाही, पण आता हे अति होतंय. शिवाय लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? हे कथित हिंदुत्त्ववादी राज्य सरकारने सांगावं.. अशी घटना विरोधी पक्षाचं सरकार असताना घडली असती तर भाजपने आणि त्यांच्या कथित अध्यात्मिक आघाडीने तांडव केलं असतं. शिवाय केवळ राजकारणासाठी अध्यात्माचा वापर करणाऱ्यांना अध्यात्माची खरी संस्कृती कशी कळणार? हाही प्रश्न आहेच.