अनवडी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या सौ. सिंधू गुरव यांचे अपघाती निधन! गावावर शोककळा!
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील अनवडी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या सौ. सिंधू जनार्दन गुरव (वय ६५) यांचा खंडाळा तालुक्यातील मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस कॉर्नरवर अपघात होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, जनार्दन गुरव हे त्यांच्या पत्नी व अनवडी गावच्या ग्रामपंचायतीच्या सदस्या सिंधू जनार्दन गुरव यांना घेऊन दुचाकीवरून रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सातारा पुणे महामार्गावर निघाले होते त्यांची दुचाकी खंबाटकीचा ओलांडून खंडाळा तालुक्यात प्रवेश करत असतानाच पाठीमागून भरधाव ट्रक आला.
खंबाटकी बोगद्यातून बाहेर आल्यानंतर जो बहुचर्चित अपघाती वळण असलेला एस कॉर्नर आहे, तिथे त्यांची दुचाकी आली, त्या वेळी खंबाटकी बोगद्यातून येत असलेला हा ट्रक ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने या दुचाकी ला पाठीमागून जोरात धडकला त्यामुळे दुचाकीवरून सिंधू गुरव या खाली पडल्या आणि क्षणार्धात ट्रक त्यांच्या अंगावरून गेला.
या अपघाताची माहिती अनवडी गावकऱ्यांना आणि खंडाळा पोलिसांना समजताच साऱ्यांनीच या ठिकाणी धाव घेतली. या ठिकाणी ग्रामस्थ देखील संतप्त झाले होते. मात्र पोलिसांनी सर्वांना शांत करत वातावरण निवळले. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे