राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन-तीन पिढ्या राजकारणात असणाऱ्या महाविकास आघाडीतील प्रस्थापितांची सत्ता उध्वस्त करीत सरदारांच्या घराणेशाहीला सुरुंग लावला. असे प्रतिपादन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले. त्यांनी देवेंद्र फडणीस यांच्या कामाचं तोंड भरून कौतुक केले.

रयत क्रांती संघटनेच्या पुणे व नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक रविवारी ( दि ११) दौंड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. सावळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यात महा विकास आघाडीच्या घराणेशाहीच सत्ता भोगत होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची धुरा हातात घेतल्यावर त्यांनी राज्यातील गावगाड्यातील कष्टकरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आमदार व मंत्री बनवले.
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून तो लुटारुंची टोळी आहे. भाजपने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळेच आम्ही घटक पक्ष भाजप सोबतच काम करणार आहोत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रयत क्रांती सेनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संधी मिळावी ह्या संदर्भात येत्या जुलै महिन्यात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
आम्ही शेतकरी चळवळीतून आंदोलन करून पुढे आलो आहे. पुढेही वंचित शेतकरी कष्टकरी मजूर यांच्यासाठी संघर्ष करू. रिपब्लिकन पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती संघटना हे भाजप सोबतच घटक पक्ष म्हणून आहेत. अशी माहिती यावेळी सदाभाऊ खोत यांनी बोलताना दिली.
तसेच राज्यातील सहकारी चळवळ संपली आहे, ही सहकार चळवळ बुडकुडी झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला कोल्हे लागल्याने या कोल्हयांचा बंदोबस्त शासनाने केला पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचे दर ठरवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर जाणीव पूर्वक कमी केले मात्र पशुखाद्यांचे दर कमी केले नाहीत. दूध माफीयांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
खाजगी दूध संघावर नियंत्रण नाही, दूध भेसळीचे प्रमाण जवळजवळ 20% आहे, दूध भेसळीचे प्रमाण रोखले तरच दूध दर वाढतील. दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतर रद्द करून साखर कारखाने उभारण्याची परवानगी द्यावी, ऊस उत्पादकांना ऊस दर ठरवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. अशी मागणी ही यावेळी खोत यांनी केली.
याप्रसंगी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा दिपाली म्हेत्रे, माजी जिल्हाध्यक्ष निलेश देवकर,इंदापूर तालुका अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब मांडे, नगर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मुंडे , पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष वारगड, करमाळा तालुकाध्यक्ष संतोष गलांडे तसेच नगर व पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.