मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू असतानाच आता नव्याने एक बातमी समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने कोंडीत पकडण्याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपच्या सर्वे करणाऱ्या यंत्रणेने शिंदे मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची सूचना केल्याचे समजते. त्यामध्ये पाचही मंत्री शिंदे यांचे निकटचे सहकारी व कथित उठावाच्या वेळेस त्यांना उघड उघड साथ देणारे व पुढाकार घेणारे मंत्री आहेत. अशा परिस्थितीत शिंदेंची मोठी कोंडी झाल्याची चर्चा सुरू झाली असून यामुळेच सध्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी राज्याच्या मंत्रिमंडळावर केंद्रीय भाजपचे रडार दिल्लीतून लक्ष ठेवून आहे. केंद्रीय भाजपकडून ज्या यंत्रणा राज्यात कार्यरत आहेत, त्या यंत्रणांकडून सातत्याने अहवाल मागून घेतला जात आहे, यामध्ये जे अकार्यक्षम मंत्री आहेत त्यांना वगळण्याची सूचना पुढे आली आहे.
त्यामध्ये भाजपबरोबरच शिंदे गटाच्या मंत्र्यांचाही समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये शिंदे गटातील आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, सातत्याने प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलणारे रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, राज्यभर प्रसिद्ध असलेले मंत्री संजय राठोड व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
या पाच मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कथित उठावावेळी सर्वात अगोदर साथ दिलेली आहे व एकनाथ शिंदे यांचे कट्टर पाठीराखे म्हणून ते ओळखले जातात, अशा मंत्र्यांना वगळून मंत्रिमंडळ विस्तार कसा करायचा असा प्रश्न शिंदे यांचे समोर आहे. त्यातच केवळ दहा महिन्यात हे मंत्री कसे वगळणार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये या मंत्र्यांना अशीच पदे होती.
त्यांना पुन्हा आमदार पदावर आणणं म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे, हे एकनाथ शिंदे यांना नक्कीच समजले असणार. त्यामुळे सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. मतदारसंघात नाराजी तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी ही दोन कारणे सगळ्यात महत्त्वाची असून कार्यक्षम नसल्यामुळे यांचा राजीनामा घ्यावा असा सूचना सर्वे करणाऱ्या यंत्रणेने केल्या आहेत.