राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल केले. शरद पवार यांच्या या मोठ्या घोषणेमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
या दोन कार्यकारी अध्यक्षांपैकी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, झारखंड या राज्यांची जबाबबदारी, तर खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देशातील महिला युवक युवती धोरण व महाराष्ट्र, हरियाणा राज्य आणि लोकसभेची जबाबदारी देण्यात आली.
या कार्यक्रमाचे शरद पवार यांनी गेली पंचवीस वर्षे ज्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी वाढवली, त्या सर्वांचे आभार मानले. कष्टकरी आणि शेतकरी यांच्या हितासाठी राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यातून गेली 24 वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली, या सर्व प्रवासात अनेक चढउतारांचा सामना करावा लागला.
आज देशात भारतीय जनता पार्टी अधिकाराचा प्रचंड मोठा गैरवापर करत असून अल्पसंख्यांक तसेच महिलांवर अत्याचार होत आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. रोजगार उपलब्ध नाहीत, दुर्बलांवर अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात हळूहळू भाजपचा पराभव होताना दिसत आहे असे पवार म्हणाले.
अनेक राज्यांनी भाजपला दूर ठेवले. आता २३ जून रोजी सर्व विरोधक बिहारमध्ये एकत्र येत आहेत. सर्वांनी मिळून काम केल्यावर देशात परिवर्तन नक्की घडवून आणता येईल असा आशावाद शरद पवार यांनी जागवला.