राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांची काही दिवसांपूर्वी बदली झाल्यानंतर आता प्रभारी तहसीलदार म्हणून आलेले अजित दिवटे यांचीही बदली झाली आहे. परिणामी तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आणि शालेय विद्यार्थ्यांचे विविध शासकीय दाखले प्रलंबित असल्याने मोठी गैरसोय होत आहे.
दौंड तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संजय पाटील यांची काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती, मात्र त्यांच्या जागी नवीन तहसीलदार नियुक्त होत नसल्याने तेच कामकाज पाहत होते. मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदार पदाचा कामकाजचा पदभार सोडल्यानंतर त्यांच्या जागी तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार म्हणून कामकाज पाहणारे अजित दिवटे यांना प्रभारी तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र त्यांचीही आता बदली करण्यात आलेली आहे. त्यामुळे तहसीलदार आणि नायब तहसीलदार ही दोन्ही महत्वाची पदे सध्या रिक्त आहेत. ही दोन्ही महत्वाचे जबाबदार अधिकारी नसल्याने तहसील कार्यालयाला कोणी वाली नाही, परिणामी तहसीलदार कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच सध्या इयत्ता दहावी व बारावीची परीक्षेचा निकाल लागल्याने पुढील शालेय प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध शासकीय कागदपत्रे व दाखल्यांची आवश्यकता असल्याने ते तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.
अनेक दाखले सध्या ऑनलाईन मध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या बाबींकडे त्वरित लक्ष घालून दौंड तहसील कार्यालयातील तहसीलदार व नायब तहसीलदार या दोन्ही पदाची नियुक्ती करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.