सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
काल पिंपळे गावात सकाळपासून तणावपूर्ण शांतता होती. ही तणावपूर्ण शांतता साऱ्यांना अस्वस्थ करत होती. विशेषतः या गावात राज्यभर प्रसिद्ध असलेलं पद्मावती देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी यात्रा भरली होती, तिथे भाविकांची गर्दी, गडबड आणि सारा भक्तिमय माहोल होता, पण तिथून फक्त काहीच फुटावर असलेल्या गावात मात्र निरव शांतता होती. शेकडो लहान मुले, मोठी माणसे, महिला, मुली इथं बसून होत्या. नेमकं काय घडत होतं?
त्यांच्या आवडीच्या एका व्यक्तीला हे गाव त्यांना सोपवायचं होतं. हे सारं चाललं होतं.. एका व्यक्तीच्या गेली अठ्ठावीस वर्ष अभाधित असलेल्या राजकीय सत्तेच्या पुन्हा राज्याभिषेकासाठी! गेली अठ्ठावीस वर्षे गावामध्ये सरपंच, उपसरपंच असं सातत्याने पद भूषवणाऱ्या अनिल बागल यांनी काल अटीतटीचे राजकारण खेळून पुन्हा एकदा सरपंच पद राष्ट्रवादीकडे खेचून आणलं. त्याची ही अंगावर काटा आणणारी कहाणी!
अनिल बागल या नावासाठी अगदी जीव पणाला लावणारे कार्यकर्ते देखील या ठिकाणी पाहायला मिळाले. पिंपळे इंदापूर तालुक्यातील छोटेसे गाव हजार सुद्धा मतदान नसलेलं हे गाव. पण हे गाव काल फक्त इंदापूर तालुक्यात नाही, तर पुणे जिल्ह्यात चर्चेच्या केंद्रस्थानी ठरलं. अर्थात निवडणूक बिनविरोध झाली. काहीच अडचण आली नाही, पण गावात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त होता.
पोलिसांनी या गावाला राजकीय दृष्ट्या संवेदनशील ठरवलंय. त्यामुळेच पोलिसांनी कोणतीही रिस्क घेतली नाही मात्र अनिल बागल यांच्या सरपंच पदाची ही कहाणी राज्याच्या राजकारणात असलेल्या प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांसाठी अतिशय महत्त्वाची! कोणत्याही परिस्थितीत हाराकरी मानायची नाही. असलेली हार लगेच पचवून लगेच विजयासाठी तयार राहायचं. त्यासाठी परिस्थिती निर्माण करायची आणि विजय खेचून देखील आणायचा! एवढी ताकद आणि ऊर्जा वयाच्या पन्नाशीनंतर ही एखाद्या राजकीय नेत्याच्या अंगात असेल, तर काहीही घडू शकतं हे दाखवणारी इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावची ही निवडणूक होती!
या गावात केवळ सात सदस्यांची ग्रामपंचायत आहे. गेली अठ्ठावीस वर्षे अनिल बागल हे कधी सरपंच तर कधी राखीव सरपंच असेल तर उपसरपंच अशा भूमिकेत या गावात वावरतात. पण पहिल्यांदाच गेल्या अडीच वर्षात काही गणित बिघडलं आणि त्यांच्या गटाचे तीनच सदस्य तर विरोधी गटाचे चार सदस्य निवडून आले.
सरपंच विरोधी गटाचा झाला, दरम्यान च्या काळात अनिल बागल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यातून ते सावरले आणि त्यांनी पुन्हा चंग बांधला. गावच्या राजकारणात कमी मतदारांचा प्रभाग असला, तर प्रचंड रस्सीखेच असते. हीच रस्सीखेच अशा गावात महत्त्वाची ठरते. अनिल बागल यांनी राजकारणातील तांत्रिक मुद्दे खेळत या गावातील सरपंचपद अपात्र ठरवलं आणि पुन्हा एकदा गावची निवडणूक लागली.
अर्थात या साऱ्या प्रक्रियेत अनिल बागल यांनी राजकारणाचे अनेक पत्ते खेळले आणि प्रभागात आपलाच उमेदवार अटीतटीच्या निवडणुकीत निवडून आणला आणि फक्त आपला उमेदवारच निवडून आणला नाही, तर लगेचच सरपंचपदाचं कार्डही त्यांनी खेळलं आणि ती देखील निवडणूक बिनविरोध जिंकत गावावर पुन्हा एकदा मांड रोवली. त्याचीच काल निवडणूक झाली आणि गावातील लहान मुलं, मुली, महिला, पुरुष, जेष्ठ व्यक्ती या साऱ्यासाऱ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीने नाचून आनंद साजरा केला.