सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २२ जून रोजी इंदापूर शहरात आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांच्या डागडुजीचे काम संबंधित प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र शहरातील लहुजी चौकातील डागडुजीने शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे.
सोमवारी (५ जून) नगरपरिषद प्रशासनाकडून इंद्रेश्वर मंदिरासमोरच्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र खड्डे न बुजवता केवळ डांबर आणि खडीचा सडा रस्त्यावर मारण्यात आला. संबंधित ठेकेदाराने खडी आणि डांबराचा मेळ न घातल्याने धाडधुडी रस्ता तयार झालाय. त्यामुळे नेहमीप्रमाणे आताही नगरपरिषद रस्त्याच्या चर्चेने फार्मात आली आहे.
झालेल्या रस्त्यावर उन्हामुळे रस्त्यावरील डांबर पूर्ण वितळत असून, नागरिकांना रस्त्यावरून चालणेही अशक्य होत आहे. डांबर नागरिकांच्या चपलांना आणि वाहनांच्या चाकांना चिटकत असल्याने नागरिक संबंधितांना शिव्यांची लाखोली देऊनच पुढे जात आहेत. त्यातच २२ जून रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखों वारकरी इंदापूर शहरात मुक्कामी येणार आहेत.
त्याआधीच इंदापूर शहरातील या रस्त्यांची चर्चा आहे. पालखी पूर्वी रस्त्यांच्या निकृष्ट डागडुजीच्या नमुन्यामुळे प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. वारंवार केलेल्या तक्रारी प्रशासनाने धुडकावल्या आहेत. त्यामुळे होणारी कामे नागरिकांना आता गप्प बसून पहावी लागणार आहेत. आजी माजी लोकप्रतिनिधींचे विकासकामांवरून होणारे वाद, लागणारे फ्लेक्स, बातम्या नागरिकांना नकोशा झाल्या आहेत.
त्यामुळे सध्याच्या कामामुळे “डांबर वर, खाली खडी, सांगा लोकहो ! बोलायचं कुणी?” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाचा तडाखा आणि रस्त्याची सद्यस्थिती पालखीपर्यंत कायम राहिल्यास वारकऱ्यांना त्रास होणार हे नक्की.
नेहरू चौक ते लहुजी चौकापर्यंतच्या नियमबाह्य पद्धतीने चाललेल्या रस्त्याच्या कामाला नागरिकांनी विरोध केला होता. परिणामी संबंधित काम दीड ते दोन वर्ष अर्धवट अवस्थेत होते. मागील वर्षी पालखीच्या पार्श्वभूमीवरच घाईगडबडीत रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र तेही निकृष्ट दर्जाचे व अर्धवट. त्यालाच पडलेले खड्डे बुजवण्याचा वरील खटाटोप सुरू आहे. चेंबर आणि रस्त्याची उंची कुठेच मेळ खाईना. जनतेचा पैसा मात्र मातीत चाललाय. सगळा भोंगळ कारभार. मात्र काय करणार जळतं घर भाड्याने घ्यायची सवय इंदापूरकरांना लागली आहे.