राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : आगामी लोकसभेच्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे अर्थात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला चितपट करण्याची जबाबदारी एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या अंत्यत निकटवर्ती असलेले व सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे विश्वासू असलेले दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
पक्षश्रेष्ठींनी दिलेली ही जबाबदारी आमदार राहुल कुल यांनी स्वीकारली आहे. महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये आमदार राहुल कुल यांना बारामती लोकसभा मतदासंघांची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजप च्या वतीने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या होत्या. त्यामुळे दौंड मधून खासदार सुप्रिया सुळे या मतदानात पिछाडीवर होत्या. इतर तालुक्यातही त्यावेळी कमी कालावधीत कांचन कुल यांनी सुळे यांना रोखण्यात यश मिळवले होते.
पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या बालेकिल्लात राष्ट्रवादीच्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीत रणनीती आखुण लोकसभेच्या उमेदवाराला रोखण्यासाठी त्या दृष्टीने आगामी बारामती लोकसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपाने आमदार कुल यांच्याकडे दिली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.