बारामती : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयपीएलच्या धर्तीवर एमपीएल स्पर्धा घेतली जाणार आहे, मात्र त्यापूर्वीच जानेवारी 2023 मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 19 वर्षाखालील वयोगटाच्या पात्रता फेरीचे सामने आयोजित करण्यात आले होते, मात्र यामध्ये 19 वर्षाखालील वयोगटाच्या संघात पुण्यातील शिळीमकर स्पोर्ट्स अकादमी या संघाने 25 वर्षीय खेळाडू खेळवला म्हणून बारामतीतील कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने शिळीमकर क्रिकेट अकॅडमी संघाचा क्रिकेटपटू अमोल कोळपे, संघमालक बारामतीतील दीपक शिळीमकर, प्रशिक्षक प्रशांत तेलंग या तिघांसह पुणे क्रिकेट असोसिएशनचा सहसचिव सुशील शेवाळे या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी बारामतीतील कसबा भागातील कारभारी फाउंडेशनचे प्रमुख प्रशांत सातव यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दिली. पुण्यात झालेल्या पात्रता फेरीत कारभारी क्रिकेट अकॅडमी चा संघ पात्रता फेरीत पराभूत झाला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पात्रता फेरीत तो प्रवेश मिळवू शकला नाही. मात्र ज्या संघाकडून हा संघ पराभूत झाला, त्या संघातील शतक केलेल्या खेळाडूचे वय २५ वर्ष असल्याने आपली फसवणूक होऊन संघाचे मोठे नुकसान झाले, या कारणावरून प्रशांत सातव यांनी ही फिर्याद दिली होती.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, प्रशांत सातव यांच्या मालकीची कारभारी यांना चॅरिटेबल फाउंडेशन नावाची संस्था आहे. त्या संस्थेअंतर्गत विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. क्रिकेट, कबड्डी, हँडबॉल, डॉचबॉल आदी खेळाच्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी कारभारी जिमखाना क्रिकेट संघ तयार करण्यात आला असून त्यामध्ये 14, 16 व 19 वर्षाखालील आणि खुल्या गटातील खेळाडू सहभाग घेतात.
या खेळाडूंना शिकवण्यासाठी नितीन सामल, विनोद यादव, संजय हाडके व सचिन माने हे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 19 वर्षाखालील वयोगटाच्या पात्रता फेरीचे सामने 19 जानेवारी 2023 मध्ये पुणे जिल्ह्यात सुरू झाले. त्या पात्रता फेरीच्या सामन्यांमध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांनी खेळाडूंच्या पात्रतेसाठी लागणारे पुरावे पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडे सादर केले होते.
या स्पर्धेचे सामने 26 व 27 जानेवारी 2023 दरम्यान पुण्यामध्ये खेळवण्यात आले. याकरिता 180 षटकांचा खेळ निर्धारित करण्यात आला होता. कारभारी जिमखाना क्रिकेट संघाची लढत शिळीमकर क्रिकेट अकॅडमी पुणे यांच्या विरोधात झाली. या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकून पहिल्या डावात कारभारी संघाने फलंदाजी केली. त्यामध्ये या संघाने 23 षटकांमध्ये फक्त 73 धावा करून संपूर्ण संघ बाद झाला.
त्यानंतर शिळीमकर क्रिकेट अकॅडमी ने पहिला डावात फक्त 58 षटकांमध्ये 326 धावा केल्या होत्या. या धावांमध्ये अमोल कोळपे नावाच्या क्रिकेटपटूने तब्बल 130 धावा केल्या. दुसऱ्या डावामध्ये कारभारी संघाने 67 षटकांमध्ये 174 धावा केल्या, त्यामुळे शिळीमकर क्रिकेट संघ हा एक डाव आणि 79 धावांनी विजयी झाला.
त्यानंतर शिळीमकर क्रिकेट संघातील अमोल कोळपे हा खेळाडू खुल्या गटात अगोदर खेळला होता अशी माहिती मिळाल्याने पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडे दाद मागितली, मात्र त्यांनी हरकत घेण्याची मुदत संपलेली आहे असे सांगून कारभारी संघाची तक्रार ऐकून घेतली नाही. त्यामुळे सातव यांनी अमोल कोळपे हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी असल्याने तेथील आरोग्य अधिकारी व जन्म मृत्यू निबंधक यांच्याकडून अमोल कोळपे यांची जन्मतारीख मागून घेतली.
त्याचा जन्म 27 फेब्रुवारी 1998 असल्याने अमोल कोळपे चे वय 25 वर्षे असूनही तो 19 वर्षाखालील वयोगटात खेळला. यासाठी पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव सुशील शेवाळे यांना भेटून ही माहिती दिली असता त्यांनी कोणतेही कागदपत्रे आम्ही देणार नाही आणि तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगितले व उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे अमोल कोळपे, संघमालक दीपक शिळीमकर, प्रशिक्षक प्रशांत तेलंग व पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव सुशील शेवाळे यांनी जाणून-बुजून फसवणूक केली अशी फिर्याद प्रशांत सातव यांनी दिली. त्यावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दंडीले करत आहेत.