राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथे दोन दिवसापूर्वी तृतीयपंथीचा धारदार हत्याराने गळा चिरून निघृणपणे खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर अवघ्या काही तासातच यवत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सचिन ऊर्फ सोनुदिदी दिनेश जाधव (वय ४० , मुळ, रा. वडापुर, ता. दक्षिण सोलापूर, सध्या रा वरवंड, ता. दौंड जि. पुणे) असे खून झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत ऊर्फ चंदर शिवाजी जाधव (वय ३०, रा. वरवंड ) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. ६ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या आसपास ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरवंड येथील बापू खोमणे यांच्या एका खोलीत भाड्याने सचिन ऊर्फ दिदी जाधव या राहत होती. आज गुरुवारी (दि.८) या खोलीतून दुर्गंधी आल्याने संशय आल्याने यवत पोलिसांना बोलावण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, दौंड प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी रेखा वाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, फौजदार विजय कोल्हे, संजय नागरगोजे यांनी घटनास्थळाची पहाणी केली, यावेळी तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आले.
दोन दिवसांपूर्वी ही हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तात्काळ संबंधित घटनेचा तपासण्यासाठी पोलीस पथके तैनात केली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी रेखा वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, संजय नागरगोजे, पोलीस नाईक हनुमंत भगत, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरु गायकवाड, अक्षय यादव, संभाजी कदम आदींच्या पथकाने अवघ्या काही तसातच आरोपीला अटक करण्याची कामगिरी केली. या प्रकरणी बापू मारुती खोमणे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.