विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
जेजुरी : खंडोबा मार्तंड देवस्थान राज्यातील व जगभरातील भाविकांचे दैवत आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त निवडीविरोधात जेजुरीत गेले १३ दिवस सर्वपक्षीय ग्रामस्थांचे आंदोलन चालू होते. विश्वस्त मंडळात स्थानिकांना डावलण्यात आल्याने स्थानिक खांदेकरी आणि नामकरी यांच्यावर अन्याय झाल्याची भावना स्थानिकांची आहे. त्यासाठी जेजुरीकरांनी आंदोलन पुकारलं होतं.
याप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून स्थानिकांना न्याय देण्याची ग्वाही त्यांना राज ठाकरेंनी दिली होती. त्यानंतर आज झालेल्या धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत जेजुरी संस्थानच्या विश्वस्तपदी जेजुरीतील 6 ग्रामस्थ आणि बाहेरच्या 5 जणांची नियुक्ती होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जेजुरीकरांचं याबाबत आंदोलन सुरु होतं. धर्मादाय आयुक्तांकडं या संपुर्ण प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. त्यानंतर यावर असा निर्णय घेण्यात आला की, एकूण विश्वस्तांपैकी ६ जण जेजुरी गावचे तर इतर ५ जण हे जेजुरी बाहेरचे असतील. धर्मादाय आयुक्तांच्या या निर्णयानंतर जेजरीकरांनी भंडाऱ्याची उधळण करत आनंद व्यक्त केला आहे.