लोणीकाळभोर- महान्यूज लाईव्ह
तो खासगी बसचा चालक.. पुण्याकडे बस घेऊन निघाला..यवत परिसरात चारचाकी वाहनांना कट मारला, ते लोक आपल्याला मारतील या भीतीपोटी एरवी जसे वाहनचालक करतात, तशीच कृती त्याने केली.. त्याने बस बाजूला घेतली, बस थांबवली आणि तो उतरून पळाला.. पण दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने धावण्याच्या प्रयत्नात खासगी बसला धडकला..आणि त्यात त्याचा जीव गेला..
ही घटना पुणे सोलापूर महामार्गावर उरूळीकांचन येथील साखरे पेट्रोल पंपाच्या परिसरात पहाटे साडेतीन वाजता घडली.. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील गोफणी येथील रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय दत्तात्रेय दिगंबर मोरे या वाहनचालकाचा या विचित्र घटनेत मृत्यू झाला.
मोरे हे खासगी बस घेऊन सोलापूरकडून पुण्याकडे निघाले होते. यवतनजिक त्याच्याकडून चारचाकी वाहनांना कट मारला गेला. ही वाहने त्याचा पाठलाग करताहेत असे त्याला वाटले आणि तो घाबरून गेला. आता हे सारे लोक स्थानिक आहेत, आपल्याला मारतील असे वाटल्याने भितीपोटी त्याने बस जोरात पळवली.
उरूळीकांचन परिसरात साखरे पेट्रोलपंपासमोर बस उभी केली. पहाटेच्या साडेतीन वाजताची ती वेळ होती. त्याने बस उभी केली, बसमधून उडी मारली आणि सोलापूरच्या दिशेने पळण्यासाठी त्याने दुभाजकावरून उडी मारली. त्याचवेळी पुण्याकडे निघालेल्या दुसऱ्या खासगी बसची त्याला जोरदार धडक बसली आणि मोरे यांचा जागीच मृत्यू झाला.