बारामती : महान्यूज लाईव्ह
काल ( दि. ५ जून ) संध्याकाळी पुण्यावरून बारामतीला येणारी पॅसेंजर पुणे रेल्वे स्टेशनवरुन वेळेत निघाली, मात्र दौंड स्टेशनवर येऊन रुसली. रात्री पावणेनऊ वाजता दौंडला पोचलेली ही गाडी रात्री पावणेअकरा वाजले ती तिथेच उभी होती. त्यानंतर ती तिथून निघाली आणि दररोजच्या साधारण दहाऐवजी तीने बारामतीत यायला बारा वाजवले. या सगळ्या प्रकारात या गाडीने बारामतीला येण्यास निघालेल्या प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले.
दौंड स्टेशनवर थांबून वैतागलेल्या या प्रवाशांचे, महिलांचे आणि रडणाऱ्या बाळांचे व्हिडिओ सोशल मिडियावर आज दिवसभर फिरत होते. काल रात्रीच या सगळ्या प्रकाराची तक्रार बारामतीच्या वरीष्ठ नेत्यांपर्यंत पोचली. कालचा उशीर हा फारच असला तरी दररोजही ही गाडी वेळेत धावते असे नाही. वंदे भारत एक्सप्रेसमुळे या गाडीला नेहमीच पंधरा वीस मिनिटे उशीर होतो असे या गाडीने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे. अनेकदा ही गाडी पुण्यातून वेळेत सुटते आणि घोरपडी सिग्नलजवळ अर्धा पाऊण तास थांबवली जाते. अनेकदा बारामतीला मालगाडी पुढे सोडल्यामुळे या पॅसेंजरला उशीर केला जात असल्याची माहिती या प्रवाशांनी दिली.
याबाबत वारंवार निवेदने देऊनही यात बदल होत नाही. त्यामुळे या गाडीने प्रवास करणारे नोकरदार, महिला प्रवासी यांना दररोज हा त्रास सहन करावा लागतो. आता कालचा प्रकार खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत गेल्याचे समजते. आतातरी या स्थितीत सुधारणा होण्याची प्रवाशांना आशा आहे.
याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता काल ( दि. ५ जून ) रोजी झालेला उशीर हा रेल्वे इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. याखेरीज दौंड ते बारामती हा सगळा रेल्वेमार्ग एकेरी रुळाचा असल्यानेही अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. दौंडवरून निघाल्यावर या मार्गावरील दुहेरी रुळ बारामतीलाच आहे. त्यामुळे मधल्या मार्गावर एखादी गाडी असेल किंवा दुसरी काही तांत्रिक अडचण आली असेल तर दुसरी गाडी दौंड किंवा बारामतीला थांबवून ठेवण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे अनेकदा या मार्गावरील रेल्वेगाड्यांना उशीर होतो. आता या मार्गावरील स्टेशनवर दुहेरी रुळांची व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे, ते पुर्ण झाल्यावर या अडचणी कमी होतील असे त्यांनी सांगितले.
दौंड ते बारामती हा सगळा रेल्वेमार्ग एकपदरी असल्यामुळे अनेकदा अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.