दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईच्या एमआयडीसीत प्लाट क्र.बी.१८७ मध्ये असणार्या रिलायंस एंटरप्रायझेस या कंपनीवर पुणे येथील महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकला यावेळी तपासणी केली असता वीज चोरी होत असल्याचे उघड झाले, यात महावितरणने तब्बल 14 लाख 72 हजार रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली.
उपकार्यकारी अभियंता विशाल बाळकृष्ण कोष्टी, तंत्रज्ञ पवन चव्हाण यांनी सहकाऱ्यांसमवेत सापळा रचून छापा टाकून तपासणी केली. त्या वेळी वीज मीटरचे सील तोडून मे २०२२ पासुन ते एप्रिल २०२३ पर्यंत पुर्ण वर्षभर वेळोवेळी छेडछाड करुन ८१ हजार ४३४ युनिटची वीज चोरी केली. त्यामुळे तब्बल १४ लाख ७२ हजार ५६० रुपयांची वीज चोरी केल्याचे उघडकीस आल्याने एमआयडीसीतील कंपनी चालकांसह वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे .
या वीजचोरी बाबत कंपनीचे जागामालक मनोज सुदाम तरटे व कंपनीचे मालक व विज वापरणारे विक्रम वसंत एरंडे, त्रंबक वसंत एरंडे अशा तिघांवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.