दौंड : महान्युज लाईव्ह
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणुन नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील बौद्ध युवक अक्षय भालेराव या तरुणाची हत्या करण्यात आली. या हत्याकांडाला राज्यातील मनुवादी विचाराचे शिंदे – फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप दौंड तालुक्यातील विविध बौद्ध संघटनेने केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, बौद्ध युवक अक्षय भालेराव याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो त्याचा राग मनात धरून गावातील काही गावगुंडांनी हत्या केल्याची घटना घडली. तसेच लातूर जिल्ह्यातील रेनापुर येथील मातंग युवकाचीही गावातील सावकाराने हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा निषेधार्थ दौंड शहरातील विविध बौद्ध व मागासवर्गीय संघटनांनी शहरातील संविधान चौकात जोरदार निदर्शने करीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
राज्यात आणि केंद्रात मनुवादी विचारसरणीचे सरकार असल्यानेच बौध्द व मागासवर्गीय समाजावर अन्याय – अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जातीय व धार्मिक दंगली घडवण्याचे षडयंत्र या मनुवादी विचारसरणाच्या हिंदुत्ववादी संघटना कडून रचले जात आहे. असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केला.
या हत्याकांडातील आरोपी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते व समर्थक सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच पोलीस प्रशासनावर दबाव आहे. या हत्याकांडाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
या हत्याकांडातील आरोपींना ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करून विशेष जलद न्यायालयात खटला चालवावा, या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे, ज्येष्ठ दलित नेते आणि माजी उपनगराध्यक्ष आबासाहेब वाघमारे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष अमित सोनवणे, भारतीय बौद्ध महासभेचे बी. वाय. जगताप, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष सागर उबाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते भारत सरोदे, नागसेन धेंडे, नरेश डाळिंबे, श्रीकांत शिंदे, नवनाथ गायकवाड आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.