दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
बेळगावकडे निघालेल्या टँकरच्या चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने महामार्गालगत वाहनाच्या प्रतिक्षेत उभ्या असलेल्या भारती राजेंद्र कांबळे (वय ३५) शारदा कैलास शिर्के (वय ६०) व कु. श्रावणी राजेंद्र कांबळे (वय १०, तिघीही रा. पांडे ता.भोर जि. पुणे) या तिघींनाही टँकरने उडविले. या झालेल्या भीषण अपघातात दोन्ही महिला जागीच ठार झाल्या, तर लहान मुलगी गंभीर जखमी झाली, तिला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघाताची माहिती आनेवाडी टोल नाक्यावरील भुईंज पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक सुशांत धुमाळ यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून ते सहकारी हवालदार अवघडे, जाधव यांना सोबत घेऊन घटनास्थळावर तातडीने दाखल झाले. जखमी मुलीला रुग्णवाहिकेव्दारे सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम यांनीही अपघात स्थळी भेट दिली व पुढील तपासासाठी सुचना दिल्या .
याबाबत अपघातस्थळावरून घेतलेली माहिती अशी, पुणे बंगलोर महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्याजवळ टँकर ( GJ 20 – V – 7473 ) हा पुणे बाजूकडून सातारा बाजूकडे निघाला होता. टॅंकरचालकाचा ताबा सुटल्याने महामार्गालगत उभ्या असलेल्या दोन महिला व एका मुलीला या टँकरने उडविले.