राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत तसेच दौंड ते पाटस या अष्टविनायक महामार्ग लगत अगदी रस्त्याला चिकटून उभारण्यात आलेले बेकायदा होर्डिंग धोकादायक बनले आहेत. हे होर्डिंग सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने त्वरित हटवण्याची मागणी होत आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, किंवा जिल्हा मार्ग या रस्त्यावर मोठमोठे लोखंडे पाईपने फ्लेक्स लावण्यासाठी बेकायदा होर्डिंग ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत. या होर्डिंगवर विविध जाहिरातींचे बॅनर लावले आहेत. रस्त्यालगत असलेले हे बॅनर वाहन चालक व प्रवाशांसाठी असुरक्षित व धोकादायक बनले आहेत. याकडे मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अष्टविनायक महामार्ग प्रशासन विभागांच्या अधिकाऱ्यांचे सोईस्करपणे दुर्लक्ष होत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष वाहन चालक व प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. रविवारी (दि ५) अचानक झालेल्या चक्रीवादळात पाटस – दौंड अष्टविनायक महामार्गावर पाटस हद्दीत अगदी रस्त्यालगत उभारण्यात आलेले लोखंडी होर्डिंग रस्त्यावरच पडले आहेत. तर काही होर्डिंगवर लावण्यात आलेल्या जाहिरातीचे बॅनरही या वादळामुळे फाटून रस्त्यावर विचित्र अवस्थेत पडले.
रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या होर्डिंगची ठिकठिकाणी हीच अवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जीवित हानी झाली नसली तरी वादळ आणि पावसाचे दिवस असून रस्त्यावरून प्रवास करताना आता वाहन चालक प्रवाशांना या होर्डिंगचाही धोका निर्माण झाला आहे. हे होर्डिंग उभारण्यात आलेल्या संबंधितांवर अष्टविनायक महामार्ग प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने गुन्हे दाखल करून कारवाई करावी. तसेच धोकादायक उभारण्यात आलेले बेकायदा होर्डिंग त्वरित हटवावेत.