राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड शहरासह तालुक्यातील अनेक भागात आज तुफान चक्रीवादळ आल्याने धांदल उडाली. या चक्रीवादळाचा तडाखा अनेक भागात बसला आहे. दौंडच्या आठवडे बाजारात या वादळामुळे बाजारासाठी आलेल्या नागरिकांची धांदल उडाली. व्यापाऱ्यांची दुकाने वादळामुळे विस्कळीत झाली.
अनेक ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर अनेकांच्या घरांची पत्रे तसेच विद्युत तारा पडल्याच्या घटना घडल्या. पाटस – दौंड अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे व झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पावसाच्या आगमनापूर्वीच तुफान वादळाने सुरुवात केली आहे. रविवारी ( दि.४) दुपारी दौंड शहरासह तालुक्यातील अनेक भागात चक्रीवादळ आले.
या अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे नागरिकांची पुरती धांदल उडाली, अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड, घरावरचे पत्रे, व्यवसायिकांचे दुकानावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले, तर अनेक भागात विद्युत खांबावरील तारां एकमेकांवर घर्षण झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. या चक्री वादळामुळे पाटस – दौंड अष्टविनायक मार्ग, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तसेच तालुक्यातील अनेक भागात रिमझिम पावसानेही हजेरी लावली.