राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनाला अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. पालखी सोहळाच्या तोंडावरच पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथे सीएनजी गॅस कंपनीने खोदाई काम चालू केले आहे. हे काम सध्या पालखी सोहळ्याला मोठा अडथळा ठरणार आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार आदी अधिकाऱ्यांनी या पालखी मार्गाचा पाहणी दौरा केला आहे. मात्र अधिकाऱ्यांचा हा पाहणी दौरा केवळ फार्स ठरत आहे. पालखी मार्गावर विविध अनेक समस्या आहेत याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे येत्या १० जून रोजी देहू येथुन प्रस्थान होणार आहे.
१५ जून रोजी या पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्यात आगमन होणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी पालखी व्यवस्थापक आणि प्रशासनाने केली आहे. या पालखी महामार्गावर कोणतेही प्रकारची गैरसोय होऊ नये, प्रवास सुखकर व्हावी, वाहतूक सुरळीत व्हावी, तसेच पालखी ज्या मार्गावर जाणार आहे त्या पालखी मुक्काम स्थळाची व विसाव्याच्या ठिकाणी कोणतेही प्रकारची गैरसोय होऊ नये याची दक्षता प्रशासन दरवर्षी घेत असते.
यंदाही शासकीय अधिकाऱ्यांनी पालखी महामार्गाची पाहणी केली. मात्र सध्या या पालखी महामार्गावर अनेक समस्या उद्भभवत आहेत. पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील बोरीभडक ते पाटस पर्यंत सेवा रस्त्यांची खड्डे पडल्याने दुरावस्था झालेली आहे. तसेच पाटस येथे सीएनजी गॅस कंपनीने पाईप लाईन टाकण्यासाठी चारी खोदण्यासाठी काम सुरू केले आहे.
हे काम नियोजित बस स्थानक व पालखी मार्गाच्या मुख्य रस्त्यावर आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्खनन केलेले मोठे मुरूम- मातीचा ढिग सेवा रस्त्यावर टाकला जात आहे. परिणामी या ठिकाणी पालखी सोहळा आल्यास अडथळा ठरणार असून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सेवा रस्त्यावरील भुयारी गटाऱ्यांची ही दुरवस्था झाली असून या गटारीवरील झाकणांची तोडफोड झाल्याने ती उघड्यावर पडली असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असल्याचे चित्र आहे.
या प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग तसेच पाटस टोल प्लाझा कंपनीचे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत आहे. दौंडचे तहसीलदार अजित दिवटे यांनी या प्रकाराकडे त्वरित लक्ष घालावे. सीएनजी गॅस कंपनीचे काम थांबवून या ठिकाणी पालखी महामार्गावर अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. सीएनजी गॅस कंपनी च्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून होत आहे.