दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाई तालुक्यातील शिरगाव येथील नीलम भोसले हिच्या आत्महत्या प्रकरणी मुंबईत पोलीस दाद लागू देत नव्हते. गुन्हा दाखल होत नव्हता. अखेर शिरगाव सह आसपासच्या भागातील नागरिक एकवटले आणि एड. अतुल भोसले यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेत त्यांना या गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात आणून दिले आणि त्यानंतर पती, सासू, नणंद यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे येथील आरोपी नणंद ही पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आहे.
शिरगाव (ता.वाई) येथील माहेरवाशीण नीलम राजेंद्र भोसले (वय २५) हिने नवरा वैभव जाधव, सासू सुवर्णा जाधव, नणंद पोलिस पत्नी सौ. वर्षा या सासरच्या कुटुंबियांकडून हुंड्यासाठी मानसिक त्रास व छळ होत होता. चारित्र्यावरुन संशय, अपमानास्पद वागणूक, माहेरच्या लोकांना तुच्छ लेखणे अशा पद्धतीचा सतत होणारा त्रास सहन न झाल्याने तिने मुंबईतील कोपरखैरणे येथील सासरी राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर येथील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. आरोपींना तातडीने अटक न केल्यास ग्रामस्थ थेट मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदनाव्दारे अटकेची मागणी करणार असल्याचा ग्रामस्थांनी कोपरखैरणे पोलिसांना इशारा दिला होता. त्यानंतर एडवोकेट अतुल भोसले यांनी मुंबई पोलिसांना आयुक्तांना भेटून याची माहिती दिली. आयुक्तांच्या आदेशानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेतला. अर्थात गुन्हा दाखल झाला असला, तरी आरोपी अजून अटक केलेले नाहीत म्हणून देखील नागरिक आंदोलन करणार असल्याचे समजते.