सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
सध्या गाईच्या दुधाचा प्रश्न ऐरणीवर असतानाच व सर्वत्र धुळ्याच्या दरातील घसरणीची नाराजी असतानाच गोमातेचं मुल्य मात्र सर्वांचे वाढलं आहे. काल वडगाव निंबाळकर येथील शेतकऱ्याने त्याच्याकडील 42 लिटर वेताची गाय इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे दोन लाख 21 हजार रुपयांना विकली. ही गाय पाठवताना वडगावच्या शेतकऱ्याने वाद्याचा गजर करून पाठवली. इंदापुरातही ती काळ फार काळ थांबली नाही. माळशिरसच्या दूध उत्पादकाने तिला २ लाख ३२ हजार रुपयांना विकत घेतले.
वडगाव निंबाळकर येथील नंदू जाधव यांच्याकडे एक ४२ लिटर प्रतिदिन दूध देणारी एक गाय काल लासुर्णे येथील व्यवसायिक तुकाराम इंगळे यांनी २ लाख २१ हजार रुपयांना विकत घेतली. या गाईला तब्बल सव्वा दोन लाख रुपयांची विक्रमी किंमत आल्याने वडगाव निंबाळकर येथील नंदू जाधव यांनी वाद्यांचा गजर करत या गाईची पाठवणी केली.
इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील तुकाराम इंगळे यांनीही गाय गोठ्यात नेऊन तिला फक्त आंघोळ घातली, तेवढ्यात माळशिरस तालुक्यातील पाटील नावाच्या दूध उत्पादकाने ती गाय दोन लाख 32 हजार रुपयांना विकत घेतल्याची माहिती नानासाहेब इंगळे यांनी दिली. एकाच गाईचा एका दिवसात तीन तालुक्यात प्रवास झाला आणि त्याची किंमत देखील लाखमोलाने वाढली.