बारामती – महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात शिकत असलेल्या सख्ख्या मावसभावंडांना दहावीच्या परीक्षेत एकसारखे गुण मिळाले आहेत. दोघांनाही विषयांमध्ये वेगवेगळे गुण मिळाले, मात्र एकूण गुण दोघांनाही प्रत्येकी ३०३ गुण मिळाले असून दोघांचीही टक्केवारी ६०.६० टक्के आहे. फक्त १०० टक्के गुण मिळवलेल्याच विद्यार्थ्यांची चर्चा होते असे नाही, असेही काही योगायोग असतात, तिथे गुणांची नाही, तर योगायोगाची गाठ पडलेली असते, जी कौतुकास्पद असते.

अंजनगाव येथील आरती प्रशा्ंत कुचेकर व तिचा मावसभाऊ कुणाल नानासाहेब सकट अशी या भावंडांची नावे आहेत. आज दहावीचा निकाल जाहीर झाला. सगळीकडे दहावीच्या गुणांची चर्चा सुरू असतानाच या दोघा भावंडांना एकसारखे गुण मिळाल्याने या योगायोगाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे आरती हिच्याच घरी कुणाल हाही राहतो आणि दोघेही एकाच विद्यालयात शिकत होते.

आरतीला एकूण गुण ३०३ मिळाले आहेत. विषयानुसार गुण पाहायला गेल्यास तिला मराठीमध्ये ६५, हिंदीमध्ये ४६, इंग्रजीमध्ये ४६, गणितात ५८, विज्ञानात ६७ व सामाजिक शास्त्रात ६७ गुण मिळाले आहेत.
तर कुणाल याला मराठीमध्ये ५५, हिंदीमध्ये ५०, इग्रजीमध्ये ४६, गणितात ४८, विज्ञान विषयात ७९, तर सामाजिक शास्त्र विषयात ७१ गुण मिळाले आहेत. त्यालाही ५०० पैकी ३०३ गुण मिळाले आहेत.
आरती हिचे वडील प्रशा्ंत हे बारामतीतील प्रसिध्द छायाचित्रकार आहेत, तर कुणाल याचे वडील बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील फेरेरो कंपनीत कामगार आहेत. कुणालचे गाव तालुक्यातीलच नारोळी हे आहे. दोघांना मिळालेल्या एकाच गुणाची सध्या गावातही चर्चा आहे.