ज्ञानेश्वर रायते, बारामती.
बारामतीतील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून राजेंद्र पवार हे सातत्याने शेतकऱ्यांना अधुनिकतेचा मंत्र देत आहेत. त्याच माध्यमातून कांदा व लसूण उत्पादकांसाठी राज्यातील प्रगत तंत्राचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण तालुक्यातील जळगाव सुपे हे गाव आता ई-स्मार्ट अॅग्री स्टेशन बनणार आहे.
या माध्यमातून कांदा उत्पादकांना रोगांचा प्रादुर्भाव व नियंत्रणाचे मार्गदर्शन, कांदा उत्पादकांना सुधारित तंत्र, बदलत्या हवामानात होणाऱ्या संभाव्य नुकसानीचा अंदाज आणि उपाययोजना याबाबत सावध करणार असून मार्गदर्शनही करणार आहे.
राजगुरूनगरच्या राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय आणि मुंबईच्या पवई आयआयटीमधील टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव सुपे (ता.बारामती, जि. पुणे) आणि परिसरातील कांदा उत्पादकांसाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे कीड, रोगांचा प्रादुर्भाव आणि नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मोबाईल संदेश प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा उत्पादकांना सुधारित तंत्र, बदलत्या हवामानात होणाऱ्या संभाव्य नुकसानीचा अंदाज आणि उपाय योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेले इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित इ स्मार्ट ॲग्री स्टेशन मुंबईतील आयआयटी संस्थेतील टीआयएच-आयओटी फाउंडेशनचे विकसित केले आहे. एका इ स्मार्ट ॲग्री स्टेशनची स्थापना जळगाव सुपे येथे करण्यात आली.
या प्रकल्पासाठी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुरेश गावंडे, वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. राजीव काळे, युवा उद्योजक शिवम गायकवाड तसेच टीआयएच-आयओटी फाउंडेशनचे हर्ष सावर्डेकर, कौशिक लांडगे, निखिल महादये यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
या प्रकल्पासाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार या्ंच्या मार्गदर्शनाखाली सीईओ प्रा. नीलेश नलावडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे तसेच मृदा शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे हे सहकार्य करत आहेत.
टीआयएच-आयओटी फाउंडेशनने विकसित केलेले इ स्मार्ट ॲग्री स्टेशन हवामानातील संभाव्य बदल, कीड,रोगाच्या प्रादुर्भावाचा अंदाज तसेच सिंचन व्यवस्थापनासाठी आवश्यक जमिनीतील ओलावा, तापमान, सामू, खतांचे प्रमाण, सभोवतालचे तापमान आणि आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग आणि सौर विकिरण आणि पानांची आर्द्रता यांची नोंद ठेवते. या नोंदीनुसार कांदा व लसूण संशोधन संचानालनातील तज्ज्ञ मार्गदर्शन पीक व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.