‘त्या’ जागेवरून उगीच चुकीच्या पद्धतीने जनतेची दिशाभूल करण्याचा काहींचा प्रयत्न : मेघ:शाम पाटील यांचा आरोप! ती जागा कॉंग्रेसची किंवा खाजगी मालकीची नव्हतीच..आता ती जागा नोंदणीकृत इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीची : मेघ:शाम पाटील
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पूर्वी कै.शंकरराव पाटील हे कॉंग्रेस पक्षाचे नेते असल्याने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारी इमारत कालांतराने काँग्रेस भवन या नावाने ओळखली जाऊ लागली. त्या जागेशी काँग्रेस किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा काहीही संबंध नव्हता व नाही, ही सर्व जागा व इमारत इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्टची आहे, असे ट्रस्टचे विश्वस्त मेघ:शाम पाटील यांनी ठणकावले.
काल काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व आमदार संजय जगताप यांनी इंदापूर चे काँग्रेस भवन चोरल्याबाबत 420 चा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता. जगताप यांनी, सरकारने 1972 साली काँग्रेस पक्षाला पक्ष कार्यालयासाठी सदर इमारत व जागा दिली, मात्र 2015 साली तत्कालीन काँग्रेस मधील असंतुष्ट लोकांनी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी चॅरिटेबल ट्रस्ट असा नावात बदल करून नोंद लावून घेतली. आणि पुढे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे दावा दाखल करून इंदापूर तालुका चारिटेबल ट्रस्ट असा नाव बदल आदेश घेतला. यामध्ये मोठी फसवणूक केली असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान ट्रस्टचे विश्वस्त मेघ:शाम पाटील यांनी ट्रस्टच्या मालकीच्या जागेवरून सुरू असलेल्या प्रश्नावरून त्यांच्या कार्यालयामार्फत प्रतिक्रिया दिली आहे.
पाटील म्हणाले की, पूर्वीच्या काळी इंदापूर तालुक्यातील सर्व सामन्य जनतेला, तालुक्याच्या ठिकाणी बसण्या- उठण्याची सोय व्हावी म्हणून शहरात मध्यवर्ती ठिकाणी शंकरराव पाटील (भाऊ ) यांनी लोकवर्गणीतून सदर जागा घेऊन तेथे इमारत बांधली.
सदर जागा ही काँग्रेस हे नाव असलेल्या देशातील अथवा राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या मालकीची केव्हाही नव्हती व नाही. सदर जागेचा कोणत्याही नोदणीकृत राजकीय पक्षाचा काही एक हक्क हितसंबंध नाही. सदरची जागा कोणाच्याही खाजगी मालकीची नसून ती इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर या नोंदणीकृत सार्वजनिक ट्रस्टच्या मालकीची आहे.
या जागेचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केला जात आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) हे त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे नेते असल्याने ही इमारत कालांतराने काँग्रेस भवन या नावाने ओळखली जाऊ लागली. त्यामुळे या जागेशी काँग्रेस किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा काहीही संबंध नाही.
धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर यांचा नावाची नोंद सरकार दप्तरी झालेली आहे. ह्या सर्व नोंदी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून झालेल्या आहेत. इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्ट या जागेचा व इमारतचा नागरपालिका कर, पाणीपट्टी, लाईट बिल आदी सर्व प्रकारचे वर्षानुवर्षे जमा करीत आहे. परंतु यामध्ये काही लोक चुकीच्या पद्धतीने जनतेची दिशाभूल करून गैरसमज निर्माण करत असल्याचा आरोप मेघ:शाम पाटील यांनी केला आहे.