बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय आज राज्यशासनाने जाहीर केला. भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते यासाठी सततचा पाठपुरावा करत होते. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येऊन आज हे नामकरण झाले. त्यामुळे गोविंद देवकाते यांनी शासनाचे आभार मानले आहेत.
१ डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला यासंदर्भात पत्र पाठवले होते. संचालनालयाने बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता यासंदर्भात पत्र पाठवून माहिती मागविली होती. ११ एप्रिल रोजी संचालनालयाने पाठविलेल्या या पत्रामध्ये गोविंद देवकाते यांच्या पत्राचा संदर्भ दिला होता. यानंतर आज ३१ मे रोजी शासनाचा हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
आज राज्याचे उपसचीव प्रकाश सुरवसे यांनी हा निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर बारामतीत गोविंद देवकाते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.