राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे फुले कुटुंबांचे मोठे भक्त असल्याचे भासवत आहेत. महापुरुषांचा अपमान आणि बदनामी केली जाते. याचा निषेध म्हणून छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांना लगवला आहे.
दौंड तालुक्यातील चौफुला येथे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या शिक्षक मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर हे प्रमुख उद्घाटक म्हणून आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की,इंडीटेल वेबसाईटवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल बदनामीकारक मजकूर टाकला गेला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्र सदनातही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा काढून अपमान केला गेला, हे पूर्ण महाराष्ट्राने आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. महापुरुषांची वारंवार होणारी बदनामी आणि अपमान जर थांबवायचा असेल कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा.
गोवारी हत्याकांडच्या वेळेस पक्षाचे आमदार मखराम पवार यांनी ज्या सभागृहात संवेदनशीलता नाही, त्या सभागृहात मी राहणार नाही असे बोलत दिड वर्ष राहिले असताना ही राजीनामा दिला होता. याच धर्तीवर महापुरुषांचा अपमान जर थांबवायचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच नेते विशेषता छगन भुजबळ यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची अद्याप आम्ही तयारी केली नाही. निवडणुकीला दीड वर्ष बाकी आहे निवडणुका लागतील त्यावेळीस आम्ही निवडणूक लढवू असे ही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे अध्यक्ष गौतम कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंतराव साळवे, उत्तमराव गायकवाड, दौंड तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे, आबासाहेब वाघमारे, विकास कदम, दत्तात्रय डाडर आदी उपस्थित होते.