सिल्लोड तालुक्यातील ही घटना असून सोमवारी (ता. २९) दोन शेतमजूरांमधील वादातून मध्यप्रदेशातील एकाचा खून झाला. विशेष म्हणजे नॉनव्हेज पार्टीसाठी दोघे शेतात गेले होते. पार्टी सुरू करतानाच मटण कमी वाढले म्हणून वाद सुरू झाला. बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यावसन हाणामारीत होऊन जितेंद्र काशीरम धुर्वे (वय ३४ वर्षे, रा. हनुमंता टापू, ता. मुंडी, जि. खंडवा, मध्यप्रदेश) याचा जीव गेला.
जितेंद्र याचा टॉमीने हातपाय तोडून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी ओमजय जगदिश सुरेश रघुवंशी (वय ३५ वर्षे, रा. छोटी पोलिस लाईनजवळष हरदा, मध्यप्रदेश) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाची थोडत्यात हकीकत अशी, आरोपी व मृत हे दोघेही मित्र होते. सिल्लोड तालुक्यातील धारला येथील शेतकरी त्र्यंबक सोनवणे यांच्याकडे शेतमजूरीसाठी आले होते. शेतातील मिरचीची राखण करण्याची काम त्यांच्याकडे दिले गेले होते.
२९ मे रोजी दोघांनी पार्टी करायचं ठरवलं. पार्टी केली, मात्र डिशमध्ये मटण कमी वाढलं यावरून दोघांत वाद सुरू झाला. शेतकरी मालक परशराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे यांनी त्यांची समजूत घातली.
मात्र रात्री ११ वाजता पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. ओमजय याने हातपाय तोडून त्याचा खून केला व त्याच्या शेजारी तो झोपून राहीला. सकाळी परसराम सोनवणे हे शेतात आले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात जितेंद्र दिसला. त्याची चौकशी केल्यानंतर ओमजय याने आपणच त्याला मारल्याचे सांगितले.