बारामती : महान्यूज लाईव्ह
मुस्लिम समाजाविषयी जातीय तेढ निर्माण होईल असे शब्द वापरून पोस्ट केल्याबद्दल पणदरे पंचक्रोशी व्हाटसएप ग्रुपचे अडमीन आणि संबंधित पोस्ट करणारे सतीश दळवी यांना माळेगाव पोलिसांनी समजपत्र बजावले असून त्यांना आज ( दि. ३१ ) रोजी चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.
पणदरे पंचक्रोशीच्या या व्हाटसएप ग्रुपमध्ये प्रामुख्याने पणदरे गावच्या परिसरात व्यक्ती समाविष्ट आहेत. यावर नेहमीच परिसराच्या विकासासाठी गरजेची चर्चा सुरु असते. मुळचे बारामतीचे पण सध्या कोल्हापूर येथे असणाऱ्या सतीश दळवी यांना काही दिवसापूर्वी या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. सतीश दळवी हे योगशिक्षक असल्याने ते त्यासंबंधीची माहिती या ग्रुपवर शेअर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी मुस्लीम समाजाविषयी आपत्तीजनक मजकूर या ग्रुपवर टाकला, अशी माहिती ग्रुप अडमीन विक्रम जगताप यांनी दिली. पणदरे परिसरात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून अशा प्रकारच्या पोष्टमुळे येथील शांततेचा भंग होऊ शकतो.
वरील पोस्टविरोधात मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी माळेगाव पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिल्याने माळेगाव पोलिसांनी याप्रकरणी कारवाईस सुरुवात केली आहे. सोशल मिडियावर व्यक्त होताना आपले विचार ठामपणे मांडावेत, पण व्यक्ती, जात, धर्म याबाबत पुराव्याशिवाय व्देषभावनेने प्रेरीत पोस्ट करु नये, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे असेही पोलीसांनी या प्रकरणी सर्वांना आवाहन केले आहे.