नाशिक : महान्यूज लाईव्ह
मुलीचं डोळ्यासमोर अपहरण केलं. या नैराश्यातून आई-वडिलांनी थेट रेल्वेखाली जीव दिला. मग संतापलेल्या गावकरी व नातेवाईकांनी या आरोपींच्या घराच्या पोर्चमध्येच चिता रचली व अंत्यसंस्कार केले. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली.
रविवारी दुपारी ही घटना घडली. निवृत्ती किसन कातळे त्यांची मुलगी पत्नी मंजुळा निवृत्ती खातळे हे त्यांच्या मुलीसह मामा दिगंबर शेळके यांच्या गावी निघाले होते मात्र घोटी महामार्गावर समाधान झनकर व त्याच्या दोन साथीदारांनी दुचाकी आडवी लावून मुलीला गाडीवर बसवले आणि आई-वडिलांच्या डोळ्यादेखत तिला पळवून नेले.
समाधान झनकर हा वारंवार आपल्या मुलीला त्रास देतो आणि आपण काहीच करू शकत नाही, हा धक्का सहन न झाल्याने या दोघांनी भगूर येथील नूतन शाळेमागे गोदान एक्स्प्रेस समोर येऊन आपले जीवन संपवले. यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी आरोपी झणकर याच्या घराच्या समोरच चिता रचली आणि त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार केले.
दरम्यान नाशिकरोड लोहमार्ग पोलिसात या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली, मात्र मंजुळा यांचा भाऊ दिगंबर भीमा शेळके यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांत झनकर व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर भरविरे गावातील गावकरी व नातेवाईक यांनी खातळे दांपत्याचा मृतदेह ताब्यात घेऊन झनकर याच्या घरासमोर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.