राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याचा दुसरा जाहीरनामा प्रसिद्ध करून ब्रिटिश राजवटीला सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मगावी म्हणजे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी भिवडी येथील स्मारक प्रचंड घाणीच्या आणि धुळीच्या विळख्यात आहे.
स्मारकाची आणि परिसराची साफसफाई आणि स्वच्छता करण्यासाठी प्रशासनाला वेळ नाही. देशासाठी पहिल्या शहीद झालेल्या एका हुतात्माचा एवढा अपमान शासनाने तर केलाच, पण राजे उमाजी नाईक यांचे नाव घेऊन समाजकारण आणि राजकारण करणाऱ्या नेत्यांनीही केला. राजे उमाजी नाईक यांचे नाव घेतले की, डोळ्यासमोर चित्र उभे राहते, ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे!
आपल्या देशबांधवांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रात्रीचा दिवस करून पुणे, सातारा परिसर पिंजून काढणारा हा नरवीर, ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड पुकारून इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारत इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडले होते. १८५७ च्या उठावाच्या अगोदरचा हा उठाव. भारतभूमीत स्वातंत्र्याचा सूर्य ह्या देशात उगवला तो याच क्रांतिवीरामुळे, पण सध्या या क्रांतिवीराचे कोणालाही देणंघेणं नाही.
आम्हाला महापुरुष आणि क्रांतिवीर फक्त आठवतात ते जयंती आणि पुण्यतिथी दिवशीच. बाकी इतर दिवशी आम्ही त्यांच्या नावाचा वापर फक्त समाजकारण आणि राजकारण करण्यासाठीच करतो. त्यांच्या नावामुळेच आम्हाला स्वार्थी राजकारण करता येते आणि समाजात मोठे नेते म्हणून वावरता येते. हे कडू सत्य मात्र मान्य करावेच लागेल. सासवड ते किल्ले पुरंदर रस्त्यावर सासवड पासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या भिवंडी हे गाव राजे उमाजी नाईक यांचे जन्मगाव म्हणून ओळखले जाते.
ह्या रस्त्यालगतच राजे उमाजी नाईक यांचे भव्य स्मारक शासनाने उभारले आहे. राजे उमाजी नाईक यांचे जयंती ७ सप्टेंबर आणि शहीद दिन ३ फेब्रुवारी वर्षातून दोनच दिवस ह्या ठिकाणी राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी मोठा जन समुदाय उपस्थित असतो. राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते. राजकीय सभाही मोठ्या थाटामाटात पार पाडल्या जातात.
समाजासाठी अमुक करू तमुक करू अशा ढीगभर आश्वासनेही दिले जाते. वर्षातून हे दोन दिवस गेले की मात्र सगळे आपापल्या कामात व्यस्त राहतात. मग इतर दिवशी या स्मारकाचे कोणाला डोकावून पाहायलाही वेळ नाही. कारण सध्या क्रांतिवीराचे हे स्मारक धुळीच्या आणि घाणीच्या विळख्यात धुळखात पडले आहे. उमाजी नाईक यांच्या अर्धपुतळ्यावर धूळ साचली आहे. या ठिकाणी केरकचरा, इतर साहित्य ठेवण्यासाठी या स्मारकाचा वापर केला जात आहे. स्मारकाच्या परिसरात गवताच साम्राज्य झाले आहे. काटेरी झुडपेही वाढली आहेत.
ज्या भूमीतून ही क्रांतीज्योत पेटली ती क्रांतीज्योत सध्या पडझड अवस्थेत आहे. अतिशय दयनीय अवस्था या स्मारकाची होत चालली आहे. राजे उमाजी नाईक यांच्या जन्मठिकाणाचीही तीच अवस्था आहे. ग्रामपंचायत प्रशासन किंवा इतर शासकीय प्रशासनकाडुन या ठिकाणी साफसफाई व स्वच्छता ही केली जात नाही हे यावरून स्पष्ट होत आहे.
सध्या भटकी कुत्रे आणि पाळीव जनावरे यांचा राजरोजपणे वावर होत असल्याचे चित्र आहे. सध्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने पुरंदर किल्ल्याकडे पर्यटकांची गर्दी होत आहे. जाता येता अनेक पर्यटक या स्मारकाला भेट देत आहे. मात्र या स्मारकाची ही दयनीय अवस्था पाहून तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ग्रामपंचायत आणि शासकीय विभागाच्या जबाबदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या स्मारकाची रोज साफसफाई, स्वच्छता करावी अशी मागणी पर्यटकांची आहे.