सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने पाणी, घरपट्टी, पाणीपट्टीचे व्याज, घरकुल, घनकचरा या २७ प्रश्नावर २७ मार्च २०२३ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले, या आंदोलनाला साठ दिवस पूर्ण झाले, मात्र नगरपालिकेच्या अधिका-यांनी अद्यापपर्यंत दुर्लक्ष केले. अधिका-यांनी जाणीवपूर्वक या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे संघर्ष समितीने नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन केले.
६० व्या दिवशी साठी बुद्धी नाठी हे नाविन्यपूर्ण आंदोलन करून आंदोलकांनी प्रशासनाचे आंदोलनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धरणे मंडपामध्ये प्रशासनाची खुर्ची मांडली. या खुर्चीला माजी नगरसेवक अतुल शेटे यांनी पुष्पहार घातला. यावेळी जमलेल्या नागरिकांनी मागण्याची, निवेदनाची पत्रके हातात घेऊन त्या खुर्चीला वाहिली.
त्या खुर्चीला मुख्यमंत्र्याची खुर्ची, प्रशासनाची खुर्ची, प्रशासकाची खुर्ची, मुख्याधिकाऱ्याची खुर्ची असे संबोधले आणि त्या खुर्चीला इंदापूरकरांचे प्रश्न ऐकवले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून इंदापूर नगरपालिकेच्या दरवाजामध्ये नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध म्हणून ८० वर्षांचे जेष्ठ नागरिक अर्जुन संभाजी शिंदे यांनी गुलाब पुष्प वाहिले आणि नगरपालिकेच्या दरवाजाची प्रतिकात्मक पूजा करण्यात आली.
त्यानंतर हे सर्व नागरिक इंदापूर नगरपालिकेत गेले. नगरपालिकेमध्ये एका खुर्चीची प्रशासनात्मक दृष्ट्या स्थापना केली व ती खुर्ची सरकारची नगरपालिकेची खुर्ची आहे असे संबोधून सेवानिवृत्त मिलिट्री मॅन मेजर महादेव सोमवंशी यांच्या हस्ते त्या खुर्चीला पुष्पहार घालण्यात आला.
त्यानंतर नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी जागेवरती जाऊन गुलाब पुष्प दिली. गांधीगिरी करून नगरपालिकेच्या दरवाजामध्ये धरणे मंडपामध्ये व नगरपालिकेमध्ये पाच मिनिटे प्रत्येक ठिकाणी स्तब्ध उभा राहून आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करू नका,अशी मागणी केली. यावेळी जमलेल्या नागरिकांमध्ये अन्याय्य व्याज व इतर प्रश्नाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. 60 दिवस झाले आमचा विचार केला नाही, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात आली.