इंदापूर : महान्यूज लाईव्ह
क्रिकेट हा असा एक खेळ आहे की मागील दीड दशकांचा जरी विचार केला तरी अगदी कट्टर शत्रुत्व देखील तो विसरायला लावतो, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीचा परिणाम क्रिकेटशौकिनावरे येथील झालेला पाहायला मिळत आहे, कारण काल आयपीएल स्पर्धेतील विजेता कोण? हे ठरणार होते. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणाऱ्या लढतीत कोण जिंकावे? हा एक कल लक्षात घेतला तर काल रात्री डकवर्थ लुईसच्या नियमानुसार चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद पटकावले आणि इंदापूर तालुक्यात रात्रीच्या बारा वाजता फटाक्यांचा धुमधडाका गावागावात पाहायला मिळाला.
गेल्या काही दिवसापासून स्थानिक सोशल मीडियामध्ये गुजरात टायटन्सवर युवकांचा राग सोशल मीडियावर देखील दिसत होता. आता त्या गुजरात टायटन्सचा आणि राजकारणाचा काय संबंध? असा प्रश्न अनेकांना पडेल, पण गुजरात मॉडेलवर राग व्यक्त करताना युवाशौकीन आपोआपच गुजरात टायटन्स संघाला तो आधार देऊ पाहत होते. स्थानिक राजकीय परिस्थितीचा आधार घेत महाराष्ट्रात चाललेल्या राजकारणाचा परिणाम युवकांवरही कसा झाला आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे आयपीएल स्पर्धेतील चेन्नई संघांची वाढलेली लोकप्रियता!
बऱ्याचदा असे घडले आहे की विश्वचषक स्पर्धा असेल आणि भारत बाद फेरीतून बाहेर पडला तर पुढील सामन्यांची उत्सुकता फार मोठी राहत नाही, अगदी क्रिकेटची प्रचंड आवड असलेलेच इतर संघांचा खेळ पाहतात, असं बऱ्याचदा दिसून आले. परंतु आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्ज हा संघच जिंकावा यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातलेले यावेळी पाहायला मिळाले.
आयपीएलच्या फायनलच्या दिवशी चेन्नईच्या संघाने डकवर्थ लुईस नियमांनुसार विजय मिळवला आणि पाचव्यांदा आयपीएलच्या चषकाला गवसणी घातली. गुजरातने चेन्नईपुढे विजयासाठी २१५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने दमदार फलंदाजी करत जेतेपद पटकावले.
गुजरातच्या २१५ धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात पावसाचे आगमन झाले. त्यावेळी चेन्नईची बिन बाद ४ अशी अवस्था होती. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमांनुसार १५ षटकांमध्ये १७१ धावांचे आव्हान ठेवले. ऋतुराज गायकवाडने चौकारासह गुजरातचे स्वागत करत ऋतुराज आणि डेव्हॉन कॉनवे यांनी दमदार फलंदाजी केली पण पॉवर प्लेनंतर हे दोघेही बाद झाले. त्यानंतर अजिंक्य राहणे खेळला. महेंद्रसिंग धोनी तर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण जडेजाने अखेरच्या दोन षटकांत १० धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
चेन्नई ने विजय मिळवल्यानंतर दिवाळीतही फुटले नसतील एवढे फटाके गावागावात फुटले. केवळ चेन्नई संघाने विजेतेपद मिळवले एवढाच हा आनंद नव्हता, तर गुजरात टायटन्स हा प्रतिस्पर्धी होता आणि गुजरात संघ, गुजरातच्या मैदानावर गुजरातला हरवले याचा आनंद युवकांना सर्वाधिक झाला होता. अनेकदा म्हटले जाते की, युवकांना राजकारणात फार रसच नाही, पण असं नाही. छोट्या छोट्या गोष्टीतही आणि छोट्या छोट्या कृतीतून युवक आपली संवेदनशीलता दाखवून देतात आणि तेच काल रात्री म्हणजेच आज पहाटेच्या दिवशी पाहायला मिळाले.