साताऱ्यात कुरिअर नेणाऱ्या वाहनांवर फिल्मी स्टाईल दरोडा! बोरगाव येथील महामार्गावरील रात्रीच्या अंधारात थरारक प्रकार
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावर सातारा तालुक्यातील बोरगाव गावच्या हद्दीत रविवारी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास कुरिअरच्या गाडीवर चार ते पाच जणांनी सशस्त्र दरोडा घातला. दरोडेखोरांनी गाडीतून तब्बल सात किलो वजनाच्या सोन्या-चांदीच्या विटांची लूट केली. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना हा थरारक प्रकार घडला. पण चोरटे फार काळ तग धरू शकले नाहीत. यवत पोलिसांनी या चोरट्यांना अलगद पकडले आणि 24 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल बोरगाव पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित केला!
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर येथील एका कुरिअर कंपनीचे कर्मचारी रात्री दोन वाजता पिकअप गाडीतून सोन्याच्या विटा आणि चांदी घेऊन पुण्याला निघाले होते. कुरिअरची गाडी सातारा जिल्ह्यातील बोरगाव हद्दीत आल्यानंतर चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी पिकअप गाडीचा अर्धा ते एक तास थरारक पाठलाग करून गाडी थांबवली.
गाडीच्या चालकाला शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी अंदाजे सात किलो वजनाच्या सोने आणि चांदीच्या विटांची लूट केली. यानंतर दरोडेखोर तेथून पसार झाले. या प्रकाराची माहिती बोरगाव पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला मिळाल्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी केली. सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे हायवे ब्रिज जवळ ईनोवा गाडी आडवी मारून कुरिअर कंपनीच्या चालकावर कोणता तरी स्प्रे फवारून ही चोरी झाली होती.
यानंतर तातडीने पुण्याच्या दिशेने दरोडेखोर गेले असल्याची माहिती मिळाल्याने बोरगाव पोलीस व सातारा पोलिसांनी पुण्याच्या पोलिसांना सतर्क केले आणि पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हे आरोपी निघाले असल्याची माहिती मिळताच यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नाकाबंदीला सुरुवात केली.
यवत पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक स्वप्निल लोखंडे, श्री वाबळे, हवालदार गणेश कर्चे, राजीव शिंदे, रवींद्र गोसावी, संदीप देवकर, अजित इंगवले, नारायण जाधव, नूतन जाधव, दामोदर होळकर, सोमनाथ सुपेकर, सागर क्षीरसागर, तात्याराम करे, श्री टकले, समीर भालेराव यांचे पथक कासुर्डी टोलनाक्याच्या ठिकाणी दबा धरून बसले.
माहिती मिळाल्यानुसार हे पथक थांबलेले असतानाच ज्या इनोवा कारणे सोन्या चांदीच्या विटा लुटल्या होत्या त्या वर्णनाची ईनोवा कार पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूर बाजूकडे जाताना दिसली पोलिसाच्या पथकाने ह्या इनोवा कारला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र गाडीतील चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी रस्त्याच्या कडेला लावून गाडीतील सहा जण जवळच असलेल्या उसामध्ये पळायला लागले मात्र पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यातील चार जणांना पकडले
यामध्ये सफराज सलीम नदाफ, मारुती लक्ष्मण मिसाळ (दोघे राहणार कुंभारे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर), सुरज बाजीराव कांबळे, करण सयाजी कांबळे (दोघेही राहणार सावर्डे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर), गौरव सुनील घाडगे (राहणार मिनचे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर ) अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांच्या ताब्यातील इनोवा गाडी (क्रमांक एम एच ०६ बी एम 3718) या गाडीची पंचांसमक्ष झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेले 80 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 18 किलो 500 ग्रॅम वजनाची चांदी, गुन्ह्यात वापरलेले छऱ्याचे पिस्तूल, चाकू व ईनोवा गाडी असा एकूण 24 लाख 72 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि जप्त केलेला मुद्देमाल आणि पकडलेले संशयित बोरगाव पोलीस ठाण्याच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आले.