दौंड : महान्यूज लाईव्ह
घटना दौंड तालुक्यातील डाळिंब गावची आहे. ज्या घटनेची माहिती मिळताच गावातीलच नव्हे तर आसपासच्या गावातील लोकांचेही डोळे ओलावले. कारण सकाळच्या वेळी काम करता करता अचानकपणे कोसळलेला मुलगा पुन्हा उठलाच नाही आणि त्यापूर्वीच दवाखान्यात उपचारासाठी नेलेल्या आईचा देखील एका तासाच्या अंतराने मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आज घडली.
डाळिंब गावातील कृष्णाबाई आत्माराम मस्के या 75 वर्षीय आईबरोबरच त्यांचा 55 वर्षाचा मुलगा राजेंद्र आत्माराम मस्के यांचेही निधन झालं. एकाच गावात एकाच ठिकाणी आई आणि लेकाच्या चितेला भडाग्नी देण्याची वेळ त्यांच्या कुटुंबीयांवर आली.
कृष्णाबाई यांना मागील आठवड्यात हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. हे उपचार सुरू असतानाच आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा राजेंद्र मस्के यांना सकाळच्या वेळी काम करत असताना अचानकपणे त्रास सुरू झाला आणि ते खाली कोसळले.
त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले, मात्र हृदयविकाराचा तीव्र झटका असल्याने उपचारापूर्वीच त्यांच्या निधन झाले होते. ही घटना त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का देणारी होती. मात्र त्यानंतर अगदी एका तासातच तिकडे सिद्धिविनायक रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कृष्णाबाई यांचेही उपचारादरम्यान निधन झाले.