दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाई ते पाचगणी मार्गावर पसरणी घाटात भरदिवसा लागलेल्या आगीमुळे डोंगरमाथ्यावरील वनसंपदा जळून खाक झाली. ही आज अज्ञात व्यक्तीने मुद्दाम लावली की वणवा पसरला याची चर्चा परिसरात असून नागरिकांमध्ये मात्र संतापाची भावना आहे.
सध्या राज्यासह देशातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. पाचगणी, महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणांसह प्रतापगड, कोकणात या मार्गाने पर्यटक उतरतात. सध्या थंड हवेच्या ठिकाणामुळे पर्यटकांची गर्दी असून या गर्दी मधूनच कोणी शौकिनाने केलेल्या कृत्यातून येथे वणवा पसरला असावा आणि आग लागली असावी.
मात्र या एका घटनेमुळे पसरणी घाटातील डोंगर रांगांमध्ये हा वणवा पसरून भोवतालची वनसंपदा त्यामध्ये जळाली. यामध्ये केवळ लहान मोठी झुडपे बळी पडली नाही, तर सरपटणारे प्राणी पक्षी पक्षांची घरटी देखील यामध्ये जळून खाक झाली.
या घटनेमुळे निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला दुःख झाले असून, वाई तालुक्यातील निसर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. वनविभागाने नागरिकांची मदत घेऊन वणवे थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांनी केली आहे.