भोर : महान्यूज लाईव्ह
राजगड पोलिसांनी कर्नाटकातून पुण्याकडे येणारा गुटखा पकडून टेम्पोसह ७० लाख रुपयांचा विमल पान मसाला ताब्यात घेतला.
राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत एक माहिती मिळवली होती. यामध्ये कर्नाटक मधून लाल रंगाचा आयशर टेम्पो (नंबर एम एच 11 सी जे ४०७५) हा पुणे बाजूकडे येत असून त्यामध्ये गुटखा भरलेला आहे अशी माहिती मिळाली.
त्यावरून राजगड पोलीस सतर्क झाले सहाय्यक निरीक्षक मनोज कुमार नवसरे, नितीन खामगळ, हवालदार महेश खरात, राहुल कोल्हे, राहुल किर्वे, तुषार खंगरे, गणेश लडकत आदींचे पथक या टेम्पोची माहिती घेत थांबले. राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा टेम्पो आला. पोलिसांना खूण पटली आणि त्यांनी या टेम्पोचा पाठलाग केला.
हा टेम्पो वारंवार थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, परंतु टेम्पोचालक टेम्पो थांबवेना! मग मात्र खेड शिवापूर टोलनाक्यावर नाकाबंदी करून हा टेम्पो पोलिसांनी पकडला. हा टेम्पो ताब्यात घेऊन सत्तर लाख रुपयांचा अवैध गुटखा व टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला. यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अन्नसुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे यांना याची माहिती देण्यात आली.
त्यानंतर बालाजी शिंदे यांनी अन्नसुरक्षा कायदा व इतर विविध कलमान्वये फिर्याद दिली व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यामध्ये नामदेव मधुकर लवटे (वय 28 वर्ष रा. निजामपूर ता. सांगोला जि. सोलापूर), चेतन दत्तात्रय खांडेकर (वय 19 वर्षे रा. निजामपूर ता. सांगोला) यांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडील तपासानुसार पोलिसांनी कर्नाटक राज्यातील विजापूर येथील शकीर निसार अलीमट्टी व विजापूर, मंगोली येथे राहणाऱ्या सद्दाम मेहबूब कोतवाल या दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.