जेजुरी : महान्यूज लाईव्ह
काल संध्याकाळी जेजुरीत ग्रामसभा झाली. ही ग्रामसभा नेहमीची नव्हती. या ग्रामसभेला संतापाची किनार होती. असं काय घडलं खंडेरायाच्या सोन्याच्या जेजुरीत? जेजुरीच्या मार्तंड देवस्थान समितीच्या नवीन विश्वस्तांवरून हा वाद उफाळला आहे. सात जणांच्या समितीत तब्बल सहा जण एका राजकीय पक्षाशी निगडित असल्याच्या कारणावरून जेजुरीकर संतापले आहेत. देवसंस्थानवर अशा पद्धतीने राजकीय मगरमिठी मारण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा जेजुरीकरांनी दिला आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबारायाच्या मंदिराची व्यवस्थापकीय कमिटी असलेल्या मार्तंड देव संस्थान समितीवर मागील आठवड्यात सात विश्वस्तांची नेमणूक झाली. या सात विश्वस्तांपैकी केवळ एक जण जेजुरीतील रहिवासी असून, इतर सहा जण हे बाहेरील व एकाच राजकीय पक्षाशी निगडित असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांचा आहे.
विश्वस्तांच्या निवडी करताना जेजुरीतील सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना डावलून जेजुरी बाहेरील सहा जणांची निवड केवळ राजकीय हस्तक्षेपतून करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांचा असून, त्यासाठी काल संध्याकाळी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत स्थानिकांकडून राज्य शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. दरम्यान आज पासून चक्री उपोषण आणि रास्ता रोको सारख्या आंदोलनांचा अवलंब करण्याचा इशारा देखील या ग्रामसभेत देण्यात आला.
जेजुरी देव संस्थांच्या विश्वस्त समितीची मुदत डिसेंबर 2022 मध्ये संपली होती धर्मदाय आयुक्त आणि त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले होते हे नेहमीची परंपरा आहे यामध्ये काही जणांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या या मुलाखती घेताना जेजुरी गडाला पायऱ्या किती? देवांची भूपाळी-आरती येते का? गाभाऱ्यात मूर्ती किती? जत्रा, यात्रा उत्सवांचे महत्त्व काय? अशा वेगवेगळ्या प्रश्नांबरोबरच देवसंस्थान निगडित अनेक प्रश्न उमेदवारांना विचारण्यात आले होते.
मात्र स्थानिक जेजुरीकर ग्रामस्थांना डावलून पुणे जिल्ह्यातील इतरत्र रहिवासी असलेल्या 5 व्यक्तींना निवडताना कोणते निकष लावले आहेत? असा प्रश्न विचारत मंदिरावर स्वतःच्या पक्षाची पकड राहावी; म्हणूनच राजकीय पक्षाने निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया जेजुरीकरांनी व्यक्त केली.