दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कडेठाण येथे रात्रीच्या सुमास जेसीबी मशीनच्या साह्याने बेकायदा माती उत्खनन करून त्याची चोरी करून वाहतूक करणाऱ्या धनंजय टेंगले याच्यासह सहा जणांवर यवत पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
तालुक्यातील वरवंड, कडेठाण, दापोडी, कानगाव या भागातील शेतजमिनीत शेतकऱ्यांच्या सहमतीने बेकायदा माती उत्खनन करून ती परिसरातील वीटभट्ट्यांना चोरून विक्री करण्याचा सपाटा गेली कित्येक दिवसांपासून सुरू आहे. कडेठाण येथे बेकायदा माती उत्पन्न सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी मंगळवारी (दि २३) रात्रीच्या सुमारास पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत सदर माहिती मिळाल्या ठिकाणी छापा टाकला. याप्रसंगी शेतजमीन (गट क्रमांक ५२८) मध्ये रात्रीच्या सुमारास जेसीबी मशीनच्या साह्याने बेकायदा माती उत्खनन करून त्याची हायवा वाहनांमधून चोरटया पध्दतीने वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी यवत पोलिसांनी विना नंबर प्लेट असलेल्या दोन जेसीबी मशीन व एक हायवा वाहन असा एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याप्रकरणी धनंजय रावसाहेब टेंगले (रा.वरवंड, ता.दौंड, जि.पुणे), कुरबान जेयनुल अन्सारी ( सध्या रा. वरंवड ता.दौंड जि.पुणे मुळ रा. मलकोको ता. बरही, जि.हजारीबाग राज्य झारखंड ), अरशद असगर अन्सारी (सध्या रा. वरंवड ता.दौड जि.पुणे मुळ रा. मलकोको ता. बरही, जि.हजारीबाग राज्य झारखंड, हायवा ट्रक चालक ), मंगेश विनायक आमराव ( रा. देऊळगाव राजे, ता.दौंड, जि.पुणे ), दगडु बाळु घुले (रा.नांदुर, ता.दौंड, जि.पुणे ), स्वप्नील काटकर (पुर्ण नाव माहित नाही) रा.शिरापुर, ता.दौंड, जि.पुणे ) यांच्यावर बेकायदा माती उत्खनन करून चोरी करणे तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विकास कापरे यांनी फिर्याद दिल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भानुदास बंडगर हे करीत आहेत. दरम्यान, यातील मुख्य आरोपी धनंजय टेंगले हा तालुक्यातील बड्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने वरवंड, हातवळण, कडेठाण, दापोडी या भागातील चोरट्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतून बेकायदा माती उपसा करणे, तसेच ओढ्या नाल्यातून बेकायदा वाळू उपसा करीत असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेकदा आल्या आहेत.
शेतकऱ्यांना दमदाटी करुन दहशत निर्माण करून हा प्रकार सातत्याने या भागात सुरू आहे. महसूल विभागाने त्याच्यावर यापूर्वी अनेक वेळा कारवाई केली मात्र राजकीय दबावामुळे त्याच्यावर ठोस अशी कारवाई केली गेली नाही. मात्र यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याकडे याबाबत गोपनीय तक्रार आल्याने त्यांनी स्वतः या ठिकाणी छापा टाकून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत धाडसी कारवाई केली.