बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील विद्यानगरी चौक काल कर्जत तालुक्यातील दुधवडी गावातील दोघा मित्रांचा काळ ठरला. दुचाकी वर चाललेल्या तिघांना डंपरने चिरडल्याने दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा ऐनवेळी दुचाकीवरून उडी मारल्याने बचावला.
बारामतीतील विद्यानगरी चौकात काल दुपारी तीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली यामध्ये प्रतीक विजय भोसले (वय २०) व निखिल सौताडे (वय २०),( दोघेही रा. दुधवडी, ता. कर्जत, जि.नगर) या दोघांचा दुर्दैव मृत्यू झाला तर त्यांचा तिसरा मित्र संदेश कुंभार हा सुदैवाने बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे मित्र एकाच रूममध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वीच निखिल सवताडे हा भारतीय सैन्यदलात भरती झाला होता. त्यांनी ऑनलाईन मोबाईल मागवला होता. हा मोबाईल घेण्यासाठी हे तिघेजण कुरिअर कंपनीकडे निघाले होते. विद्यानगरी चौकातून विमानतळाच्या दिशेने निघालेल्या डंपरच्या पुढे हे तिघेजण होते. या डंपरची ठोस बसल्याने दोघे डंपरखाली चिरडले गेले, तर तिसरा संदेश हा सुदैवाने बचावला.