लवकरच शहर व ग्रामीण भागातील आणखी गुन्हेगार तडीपार होणार.. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची माहिती
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर शहरातील कत्तलखान्यात बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल करत असल्याच्या कारणावरून शहरातील पाच व ग्रामीण भागातील एक अशा सहा जणांच्या टोळीवर एक वर्षांकरिता तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करण्यात आलेल्या तडीपारीच्या कारवाईत टोळीप्रमुख रशीद इस्माईल कुरेशी (वय ४२ वर्षे, रा. कुरेशीगल्ली , इंदापूर), इरफान इमाम शेख (वय ३२, रा.कांदलगाव ता.इंदापूर), अजीम मुनिर कुरेशी (वय ३०), कलीम कय्युम कुरेशी (वय ३२), समीर हारुण कुरेशी (वय ३२), अश्पाक रियाज कुरेशी (वय २३) सर्व रा. कुरेशीगल्ली , इंदापूर ता.इंदापूर जि.पुणे) यांचा समावेश आहे.
पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असून सहा जणांच्या टोळीला संपूर्ण पुणे जिल्हा, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालूका, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका व माढा तालूका तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण तसेच पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीसह तडीपारीचे आदेश करण्यात आले आहेत.
याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिल सहा जणांनी संगनमत करुन इंदापूर शहरातील कुरेशी गल्ली या ठिकाणी तसेच आसपासच्या परिसरात त्यांच्याकडे कोणताही शासकीय परवाना नसताना तसेच त्यांच्याकडे कत्तल केलेले प्राणी व जिवंत प्राणी हे प्रजननक्षम नसलेबाबत व किंवा शेतीच्या मशागतीसाठी उपयोग नसल्याचे संबंधीत प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र नसताना बेकायदेशीरपणे जनावरांचे कत्तल करताना, गुन्हे करताना मिळून आले होते.
त्यांच्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण तसेच पशु क्रुरता अधिनियम अन्वये एकूण पाच गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे कारवाई होणेकामी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने वरील सर्वांना पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी एक वर्षाकरिता तडीपारीचे आदेश दिले आहेत.
वरील तडीपार करण्यात आलेल्या सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशाप्रमाणे इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतून जिल्हा उस्मानाबाद तालुका परांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 23 मे 2023 रोजी सोडण्यात आले. तसेच इंदापूर शहरातील व ग्रामीण भागातील आणखी गुन्हेगार थोड्याच दिवसात तडीपार होणार असल्याची माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पत्रकारांना दिली.
सदर कारवाई मध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार महेश बनकर, हवालदार प्रकाश माने, ज्ञानेश्वर जाधव, सचिन बोराडे, वीरभद्र मोहळे, पोलीस नाईक सलमान खान, पो.कॉ. नंदू जाधव, पो.कॉ. गजानन वानोळे आदी अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग नोंदवला.